राज्याला ज्ञान देण्याऐवजी बोदवडचा रस्ता करा आणि मगच बोला- पालकमंत्री

बोदवड, प्रतिनिधी | महाराष्ट्राला ज्ञान शिकविण्याऐवजी बोदवडचा रस्ता करा आणि मगच बोला अशी जोरदार टिका पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी खडसेंचा नाव न घेता लगावला आहे. ते शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ बोदवड येथे जाहीर सभेत बोलत होते.

बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ बोदवड येथील गांधी चौकात जाहीर सभा शनिवारी पार पडली. सभेच्या सुरुवातीला माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे एकेकाळचे समर्थक भाजपाचे माजी उपनगराध्यक्ष दिनेश माळी व नगरसेवक संजय गायकवाड यांनी शेकडो समर्थकांसह पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. सभेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुक्ताईनगर मतदार संघाच्या प्रलंबित विकास कामांवर त्यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव न घेता टोले लगावले. सुरुवातीला विधानसभा संपर्कप्रमुख विनोद चव्हाण यांचे भाषण झाल्यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले.

यावेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी कालपासून जळगाव जिल्ह्यात गरम वातावरण होत आहे. ते आता थंड व्हायला लागलंय अशी भाषणाची सुरुवात करत तीस वर्षे राहिलेल्या आमदाराला माझे चॅलेंज आहे. धरणगावला या आणि विकास बघा. महाराष्ट्राला ज्ञान सांगण्याअगोदर बोदवडचा रस्ता करा मग बोला अशी टीका पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता खडसेंवर केली आहे. तसेच ज्यांनी ज्यांनी बोदवड करांना पाण्यासाठी तरसवल त्यांना – त्यांना पाणी पाजण्याकरता गुलाबराव पाटील आला आहे. मुक्ताईनगर मध्ये एकही व्यापारी संकुल नाही. काय दशा करून टाकलीय ? पाळधी गावात येऊन व्यापारी संकुल बघा. आपले शहर कोणी खड्ड्यात घातलं? या कडे बघून मतदान करण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केले. त्याचबरोबर शहराचा विकास करण्यासाठी पालकमंत्री व नगरविकास मंत्री हे महत्त्वाचे खातं शिवसेनेकडे आहे. असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

बोदवड शहराच्या पाणीप्रश्नासाठी शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर प्रती दिवस पाण्याची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून लवकरच नवीन योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. शहराला एक – एक महिन्यानंतर पाणीपुरवठा होत होता. आता सात दिवसांत नळाला पाणी येते. शहरात व्यापारी संकुल विकसित करणे , तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांनी भाषणातून उपस्थितांना संबोधित केले. दरम्यान एक काळ होता या जिल्ह्यात तीन – तीन मंत्री असायचे. आता मी एकटाच आहे. पालकमंत्री  सुद्धा आहे. त्यामुळे तिजोरीची चावी आपल्याकडेच आहे. आपल्या हातात जिल्हा नियोजन समिती आहे. शहराचा चेहरा बदलण्यासाठी नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे आहेत. मुख्यमंत्री सुद्धा शिवसेनेचे आहेत. नगरविकास खाते व पालकमंत्री या खात्यामुळे शहराचे चित्र बदलू शकते.  एक वेळ विश्वास टाका. पालकमंत्री , नगर विकास मंत्री  ,आमदार शिवसेनेचे आहेत. त्यानंतर नगरसेवक , नगराध्यक्ष सुद्धा शिवसेनेचे करा मग विकास बघा असे वक्तव्य पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

मागील ३० वर्षात  ग्रामपंचायत , पंचायत समिती , जिल्हा परिषद , आमदार , खासदार , मंत्री पदे तुमच्याकडे होते.  मग तुम्ही केलं काय ? शहराचे काय वाटोळे केले. बोदवड शहरातील लोकांचे घरे नावावर करु शकले नाहीत. मात्र ; तुमचे घरे पुण्यापर्यंत गेले. लोक कलाकार आहेत. त्यांना संगळ समजते असा टोलाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसेंवर लगावला.

Protected Content