नाशिक प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग कमी झाला असूनही राज्यातील मंदिरे बंदच असल्याचा निषेध करत मंदिरे खुली करण्यात यावीत या मागणीसाठी जन्माष्टमीपासून भाजपची आध्यात्मीक आघाडी आंदोलन करणार आहे.
भाजप अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत जन्माष्टमीपासून आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. राज्यातील मंदिरे ठाकरे सरकारने बंद केली आहेत. सत्तेच्या नशेत गुंग असलेलं हे सरकार आहे. सरकारच्या या धोरणामुळे मंदिरावरच पोट असलेल्यांची सध्या उपासमार होत आहे. सरकार त्यांना मदत देखील देत नाही. मंदिरांवर अवलंबून असणार्या लोकांना आर्थिक पॅकेज का नाही?, असा सवाल करतानाच त्यामुळेच ठाकरे सरकार विरोधात रणशनिंग फुंकण्याची वेळ आली आहे, असं तुषार भोसले म्हणाले.
राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यात यावीत या मागणीसाठी जन्माष्टमीपासून राज्यातील मंदिरांबाहेर आंदोलन करण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व प्रमुख मंदिरांबाहेर आंदोलन करण्यात येणार आहेत, असं सांगतानाच तिसर्या लाटेचा धोका फक्त मंदिरांमुळेच येतोय का?, असा सवाल त्यांनी केला.