मुंबई (वृत्तसंस्था) विधान परिषद निवडणुकीवरून राज्यपालांविरुद्ध शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर आज शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीला राजभवनवर पोहोचले आहेत. त्यामुळे या भेटीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा होईल, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत राजभवनवर दाखल झाले आहे. त्यांच्या भेटीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. गेले दोन महिने विधान परिषद निवडणुकीवरून राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात चांगलीच जुंपली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य बनवण्याचा प्रस्ताववरून राज्यपाल विरुद्ध शिवसेना असेच चित्र निर्माण झाले होते. राज्यातील प्रमुख प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांची राजभवनवर बैठक बोलवल्यानंतर संजय राऊत यांनी राज्यपालांवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय राऊत राज्यपालांच्या भेटीला एक वेगेळे महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि संजय राऊत यांच्यात काय चर्चा होतेय, याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.