भुसावळ प्रतिनिधी । शहरातील रस्त्यांमध्ये पडलेल्या खड्डयांनी नागरिक हैराण झाले असल्याने येथे शिवसेनेतर्फे यात साचलेल्या पाण्यात कागदी होड्या सोडून निषेध व्यक्त केला. तसेच नागरिकांना झेंडू बाम व आयोडेक्सचे वाटप करण्यात आले.
भुसावळातील सर्वच रस्त्यांवर जागोजागी जीव घेणे खड्डे व चिखल दिसू लागला आहे. हे खड्डे त्वरेने बुजवण्याचे काम भुसावळ नगरपालिकेने हाती घेण्याची इच्छा सुद्धा दाखवली नाहीय. यामुळे लोकांनी, वाहनचालकांनी ङ्गरस्त्यात खड्डा की खड्डयांत रस्ताफ अशी शेरेबाजी सुरू केली आहे. त्यामुळे शहरात शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, तालुका प्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर शिवसेनेच्या वतीने कागदी नावा खड्डयातील साचलेल्या पाण्यात सोडण्यात आल्या.
सोशल डिस्टन्सचे पालन करीत पुढे खड्डा आहे, अपघात होऊ शकतो, वाहन सावकाश हाका अश्या सूचना प्रवाश्यांना देत झेंडू बाम व आयोडेक्स वाटप केले. तालुका संघटक धिरज पाटील, शहर प्रमुख बबलू बर्हाटे, विभाग प्रमुख निखिल बर्हाटे, दिव्यांग सेना तालुका प्रमुख फिरोज तडवी उपस्थित होते.
याप्रसंगी शहरप्रमुख बबलू बर्हाटे म्हणाले की, फक्त प्रेस कॉन्फरन्स घेऊन जनतेच्या समस्या मार्गी लागल्या असत्या तर नगरपालिकेत नगरसेवकांचे काय काम राहिले असते. पालिका निवडणूकित इतर सर्व पक्षांना नाकारून सत्ताधार्यांना जनतेने काम करण्यासाठी निवडुन दिले आहेत, त्यांनी काम करून दाखवावे. शिवसैनिक नक्कीच त्यांचा सत्कार करतील. स्थानिक खासदार, आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवकांनी गाडीतून फिरण्यापेक्षा रस्त्यावरून फिरावे आणि रस्ता बनविताना तो पाच वर्षे खराब होणार नाही, याची लेखी हमी विकासकाकडून घ्यावी. अन्यथा सत्ताधार्यांवर भुसावळकरांना खड्डयात टाकलं, आम्ही करून दाखवलं अशी म्हणन्याची वेळ येईल, सत्ताधार्यांनी नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तरी रस्ते दुरुस्त करावे असे ते म्हणाले.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागच्या वर्षी दोन वेळेस भुसावळात आले तेव्हा नुसत्या देखाव्यासाठी, नंतर गणेश विसर्जन व दुर्गामाता विसर्जन वेळेस खड्डे दुरुस्त केले गेले. यावर्षी समस्या जास्त वाढली तरी दुरुस्ती नाही. अपरिहार्यपणे वाहनांतून प्रवास करावा लागणार्या महिला, बालके, वयोवृद्ध महिला-पुरुष, आजारी रुग्ण, तसेच मानेची व कंबरेची व्याधी सहन कराव्या लागणार्यांना यातून प्रवास करताना आणखी हाल सोसावे लागत आहेत. भुसावळच्या सत्ताधा-यांना खड्डे कमी करता आले नाही परंतु वेदना वाढवल्या म्हणून स्वखर्चाने शिवसेना तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी ५०० प्रवाश्यांना झेंडू बाम व आयोडेक्स वाटले.