मुंबई- लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृतसेवा– रशिया आणि युक्रेन या देशातील युद्धामुळे दूरगामी परीणाम होण्याची चिन्हे आहेत. कच्च्या क्रुडऑइलच्या किमतीत वाढ होत आहेच, यासोबतच परदेशातून आयात होणाऱ्या वाहन उद्योगासाठी लागणाऱ्या पोलादाच्या वाढत्या किमतीमुळे या उद्योगक्षेत्रातील भांडवलदार अडचणीत आले आहेत. त्यामुळे दुचाकी किंवा चारचाकी वाहनाच्या किमतीत वाढ होण्याची दाट शक्यता उद्योजकांकडून व्यक्त केली जात आहे.
गेल्या दोन वर्षापासून संसर्ग प्रादुर्भावामुळे अनेक उद्योजक अडचणीत आले आहेत. करोना काळात बँकांनी दिलेले अर्थसहाय्यामुळे उद्योग जेमतेम जोर धरू लागले आहेत, त्यातच रशिया- युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे लागणारे स्टीलचे दर दुपटीने वाढले आहेत. पोलादाच्या वाढत्या किमतीमुळे खेळत्या भांडवलासाठी नव्याने कर्ज घेण्याची वेळ आली असून किमतीत वाढ झाल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. पर्यायाने उत्पादन खर्चात वाढ झाल्याने येत्या काळात दुचाकी व चारचाकी वाहनांच्या किमती पुन्हा वाढणार आहेत. पोलाद आणि स्टीलच नव्हे तर कोळशाचे दरवाढ झाली आहे. स्टील उद्योगासाठी उपयोगात येणारा मेटलर्जीकल कोळशाचे देखील आतंरराष्ट्रीय दर वाढलेले आहेत. त्यामुळे स्टील उत्पादनाच्या खर्चात तीन ते चार पात वाढ झाली आहे. वाहनाचे सुटे पार्टस बनविणाऱ्या अनेक लघु उद्योजकांना करोना संसर्ग काळात बँकांनी कर्ज दिले. उद्योग जेमतेम सुरु होत नाहीत तोच रशिया व युक्रेनकडून येणारे स्टील आणि धातू पुरवठाही आता विस्कळीत झाला असून उद्योग चालविता येणे अवघड झाले आहे. त्यामुळे नव्याने कर्जाच्या रांगेत उभे राहण्याशिवाय पर्याय उरलेला नसल्याचे उद्योजक, व्यावसायिकांनी मत व्यक्त केले आहे.