रवी शंकर प्रसाद यांचीही शरद पवारांवर टीका

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।  राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला तरच शरद पवार यांची विश्वसार्हता प्रस्थापित होईल अशी टीका आता केंद्रीय कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनीही केली आहे

 

आधी अँटिलियाबाहेरच्या जिलेटिनच्या कांड्या, नंतर मनसुख हिरेन यांची हत्या, सचिन वाझेंचा त्यातला सहभाग, परमबीर सिंग यांचा लेटरबॉम्ब आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केलेलं पोलीस बदली रॅकेट प्रकरण. या सगळ्या प्रकरणावरून भाजपाच्या राज्यातल्या नेत्यांकडून ठाकरे सरकारला धारेवर धरण्याची एकही संधी सोडली जात नसताना आता भाजपाच्या केंद्रातील नेत्यांनी आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे.

 

केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील ठाकरे सरकारवर टीका करतानाच थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “शरद पवार नेमक्या कोणत्या कारणामुळे अनिल देशमुख यांना पाठिशी घालत आहेत?” असा सवाल रवीशंकर प्रसाद यांनी केला आहे.

 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये अनिल देशमुखांवर कोट्यवधी रुपयांच्या वसुलीसाठी पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावरून अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली असून खुद्द शरद पवारांनी मात्र दोन वेळा पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख यांची पाठराखण केली आहे. त्यावरून आता विरोधकांच्या टीकेचा रोख अनिल देशमुखांसोबतच शरद पवारांच्या दिशेने देखील वळू लागला आहे.

 

 

 

रवीशंकर प्रसाद यांनी देखील राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. “हा महाराष्ट्र शो नेमकं कोण चालवत आहे? हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात कन्फ्युज सरकार आहे का? या वसूली आघाडीची राजकीय दिशा काय आहे? शरद पवार अनिल देशमुखांना पाठिशी का घालत आहेत?”, अशा शब्दांत रवीशंकर प्रसाद यांनी टीका केली आहे. “अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला, तरच शरद पवारांची विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित होऊ शकेल”, असा देखील निशाणा रवीशंकर प्रसाद यांनी साधला आहे.

Protected Content