मुंबई : वृत्तसंस्था । पाच दिवसांसाठी आपली पोलीस कोठडी वाढवण्यावर कोणताही आक्षेप नसल्याचं व आपल्याकडे काही माहिती असून ती तपास अधिकाऱ्याला द्यायची असल्याचं रवी पुजारीने न्यायाधीशांना सांगितलं. लगेचच न्यायाधीशांनी त्याच्या पोलीस कोठडीच १५ मार्चपर्यंत वाढ केली.
अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला मंगळवारी मुंबईच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी एकीकडे त्याचे वकील रवी पुजारीला पोलीस कोठडीत ठेवलं जाऊ नये असा युक्तिवाद करत असताना दुसरीकडे रवी पुजारीने मात्र आपल्याला पोलीस कोठडीत राहायचं असल्याचं सांगितलं. राज्याच्या वतीने विशेष सरकारी वकील सुनील गोन्साल्विस आणि खंडणीविरोधी पथकाकडून वकील सचिन कदम यांनी पुजारीची कोठडी वाढवून देण्याची विनंती केली होती.
पुजारीला सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी आतापर्यंत झालेल्या तपासाचा अहवाल सादर करत रवी पुजारीची अजून काही चौकशी करायची असल्याने कोठडी वाढवून देण्याची विनंती करण्यात आली. न्यायाधीशांनी औपचारिक प्रक्रियेनुसार, रवी पुजारीला पोलिसांविरोधात काही तक्रार आहे का? असं विचारलं असता त्याने नाही असं उत्तर दिलं. पोलिसांच्या वागणुकीसंबंधी आपली कोणतीही तक्रार नसल्याची माहिती त्याने न्यायालयात दिली.
यानंतर गोन्साल्विस यांनी रवी पुजारीने दिलेला कबुली जबाब सादर करत पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली. रवी पुजारीच्या वतीने युक्तिवाद करणाऱ्या वकील एम मानेकर यांनी तपास अधिकाऱ्यांना पुरेशी संधी देण्यात आली असून पोलीस कोठडी वाढवली जाऊ नये अशी विनंती केली. मानेकर यांचा युक्तिवाद सुरु असतानाच रवी पुजारी उभा राहिला आणि आपल्याला बोलायचं असल्याचं सांगितलं.
विलेपार्ले येथे २१ ऑक्टोबर २०१६ रोजी झालेल्या एका गोळीबाराच्या घटनेत रवी पुजारीला २२ फेब्रुवारीला बंगळुरु येथून मुंबईला आणण्यात आलं. मुंबईत रवी पुजाराविरोधात ५२ केसेस आहेत. २००२ मध्ये रवी पुजारीविरोधात रेड कॉर्नर नोटीसदेखील प्रसिद्ध करण्यात आली होती. गेल्या एक वर्षापासून तो बंगळुरु कोर्टाच्या कोठडीत आहे.