धरणगाव, प्रतिनिधी । रब्बी ज्वारी व मका शासकीय केंद्र त्वरीत सुरु करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे धरणगाव तालुका अध्यक्ष संजय महाजन यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे.
कोराना व्हायरसच्या वैश्विक महामारीमुळे शेतकरी पूर्णत: आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यात शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची विवंचना अधिक वाढलेली आहे. ह्या बाबींचा गांभिर्याने विचार करून व शेतकऱ्यांप्रती सहानुभूती दाखवून रब्बी ज्वारी व मक्याचे शासकीय खरेदी केंद्र त्वरीत सुरु करण्यात यावी. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्रे सुरु झाली आहेत. त्या त्या तालुक्यातील शेतकऱ्यांची कापूस खरेदी त्याच तालुक्यातील खरेदी केंद्रावर व्हावी. धरणगाव तालुक्याच्या कापूस खरेदी केंद्रावर धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनाच प्राधान्य द्यावे. इतर तालुक्यातील शेतकऱ्यांचा विचार नंतर व्हावा. तसेच खरेदी केंद्रावर वाय वन प्रकाराच्या कपाशीची खरेदी केली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची वाय वन कपाशी पडून आहे. तरी वाय वन कपाशी खरेदीची सूचना व्हावी. वरील सर्व बाबींचा विचार करुन शेतकऱ्यांवरील अन्याय व पिळवणूक थांबवावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी शेतकन्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.