रतन टाटा यांचा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान

 

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशाच्या औद्योगिक जडणघडणीत बहुमूल्य योगदान दिल्ल्याबद्दल ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

टाटा यांना असोचेम इंटरप्राईज ऑफ द सेंच्युरी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘असोचेम’ या औद्योगिक संघटनेचा शतक महोत्सवी स्थापना सप्ताह समारोह आज पार पडला. आभासी पद्धतीने सुरु असलेल्या या सोहळ्यात टाटा यांना गौरवण्यात आले.

यावेळी असोचेमचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी, डॉ. दीपक सूद, नियोजित अध्यक्ष विनीत अगरवाल, बाळकृष्ण गोएंका, बाबा कल्याणी, टाटा सन्सचे अध्यक्ष टी. चन्द्रशेखरन आणि सत्कारमूर्ती रतन टाटा यांच्यासह अनेक बडे उद्योजक उपस्थित होते.

कोरोना संकटात केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनाबाबत उपस्थित उद्योजकांनी समाधान व्यक्त केले. ‘प्रधानमंत्री आवास योजने’त २०२२ पर्यंत एक कोटी घरे निर्माण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण होईल,असा विश्वास असोचेमचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी व्यक्त केला. ‘आत्मनिर्भर भारत’साठी असोचेमचे लाखो सदस्य उद्योजक सहभाग घेतील, असे त्यांनी सांगितले. भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढवण्यासाठी देशातील उद्योजक सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करतील, असा विश्वास दीपक सूद यांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारने आर्थिक सुधारणांवर भर दिला आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत जाहीर केलेल्या योजना अर्थव्यवस्थेसाठी पूरक ठरत आहेत, असे बाळकृष्ण गोयंका यांनी सांगितले. लघु आणि मध्यम उद्योजकांना सरकारच्या अनेक योजनांचा फायदा झाला आहे, असे मत असोचेमचे नियोजित अध्यक्ष विनीत अगरवाल यांनी व्यक्त केले.

भारत नेहमीच जगाला मार्ग दाखवत आला आहे. कोरोना संकटात आपण हे जगाला दाखवून दिले. यापुढे आपण संकटाला एकीतून सामोरे जाऊ असा विश्वास रतन टाटा यांनी व्यक्त केला. टाटा यांनी कोरोना संकटात सरकारने केलेल्या कामाचे कौतुक केले.

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी उद्योजकांना संबोधित केले. असोचेमचे शतक महोत्सवी वर्ष आहे. या संघटनेने देशाच्या विकासाची गाथा अनुभवली आहे. संघटनेची सुरुवातीची २७ वर्षे पारतंत्र्यात गेली. आता देशाच्या स्वातंत्र्याचा शतक महोत्सव २०४७ मध्ये आहे. या पुढील २७ वर्षात असोचेमने न्यू इंडिया, आत्मनिर्भर भारतसाठी भरीव योगदान द्यावे, असे आवाहन मोदी यांनी यावेळी केले.

ते म्हणाले की काही वर्षांपूर्वी भारताची प्रतिमा जागतिक पातळीवर नकारात्मक होती. इथले जुने आणि किचकट कायदे, गुंतवणुकीबाबत उदासीनता यामुळे गुंतवणूकदार प्रत्येक बाबतीत प्रश्न उपस्थित करायचे. सरकारच्या धोरणांबाबत पूर्वी गुंतवणूकदारांच्या मनात Why India असा प्रश्न उपस्थित व्हायचा. मात्र आताच्या सुविधा आणि बदल पाहता याच गुंतवणूकदारांच्या मनात भारताबाबत Why not India असा विचार येतो, हे दिसून आले आहे, असा दावा त्यांनी केला.

मागील सहा वर्षात भारतातील चित्र बदलले आहे. इतर देशांची तुलना करताना गुंतवणूकदार भारताला पसंती देत आहे. प्रत्येक बाबतीत आज सरकारने गुंतवणूकदारांपुढे लाल गालिचे टाकले आहे. हा बदल अर्थव्यवस्थेसाठी कलाटणी देणारा आहे, असे मोदी यांनी सांगितले.कोरोना संकटात भारतात सर्वाधिक परदेशी गुंतवणूक झाली असेही मोदी यांनी यावेळी सांगितले. सहा वर्षांमध्ये तब्बल १५०० कायदे सरकारने रद्द केले आहेत. सहज आणि सुलभ व्यवसाय करण्याला सरकारचे प्राधान्य आहे.

सहा महिन्यापूर्वी सरकारने कृषी कायद्यांमध्ये सुधारणा केली. या सुधारणांचे लाभ आता देशातील शेतकऱ्यांना मिळत आहेत, असे मोदी यांनी सांगितले. कोरोना काळात भारताने जगाला औषधे पुरवली होती. यापुढे संकट काळात भारत जगाचे नेतृत्व करेल आणि ज्या देशांना गरज भासेल त्यांना मदत करेल, अशी ग्वाही मोदी यांनी दिली. उद्योजकांनी संशोधनावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केली.

Protected Content