यूपीएससी प्रशिक्षण घेणाऱयांची शिष्यवृत्ती दुप्पट

मुंबई : वृत्तसंस्था| केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दुप्पट करण्याचा निर्णय कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्रालयाने घेतला आहे. शासन आदेशही जारी झाला आहे.

अल्पसंख्याक समाजाचे शासकीय सेवेतील प्रमाण वाढवण्यासाठी, या उमेदवारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

अल्पसंख्याक मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख, पारशी आणि ज्यू समाजाचे शासकीय सेवेतील प्रमाण वाढावे याकरिता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी अल्पसंख्याक समाजातील निवडक, होतकरु विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत प्रशिक्षण दिले जाते. राज्य प्रशासकीय संस्थेच्या मुंबई, कोल्हापूर, नागपूर आणि औरंगाबाद येथील प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रति केंद्र दहा विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येते. या विद्यार्थ्यांना सध्या प्रति महिना २ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते.

उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या नागरी सेवा पूर्व परिक्षा प्रशिक्षण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत प्रति महिना २ हजार रुपयांवरुन ४ हजार रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. अशाच पद्धतीने अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीतही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री मलिक यांनी सांगितले. ही वाढ २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येत आहे.

Protected Content