यावल शहरात वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलनाचा इशारा; भाजपाचे महावितरणला निवेदन

यावल प्रतिनिधी । शहरात वारंवार होणाऱ्या अघोषित वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये वीज महावितरण कारभाराबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत असून यासंदर्भात महावितरण कंपनीने तात्काळ उपाय योजना आखावी अन्यथा प्रसंगी पक्षाच्यावतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा एका तक्रार निवेदनाद्वारे भारतीय जनता पक्षाचे यावल तालुकाध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांच्यावतीने महावितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे.

भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, यावल व परिसरात मागील १५ ते २० दिवसापासून महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे वारंवार अघोषित रात्री किंवा दिवसा वीजपुरवठा खंडित केला जात असून विज महावितरणच्या मनमानी व अनियंत्रित कारभाराचे भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागत असून दरम्यान सध्या महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या हाताला काम व रोजगार नसल्यामुळे अनेक संकट नागरिकांसमोर येऊन ठेपली असून अशा अवस्थेत महावितरण कंपनी द्वारे विज धारकांना सलग तीन महिन्याचे अवा की सव्वा विज बिल पाठवण्यात आले. आधीच तासंतास वारंवार होणारा खंडित वीजपुरवठा तसेच कमी दाबाचा वीजपुरवठा यामुळे होणारे घरातील फ्रिज, कुलर, टीव्ही, ट्यूबलाइट्स आदींवर नागरिकांच्या जीवन आवश्यक महागड्या वस्तूंवर विपरीत परिणाम होत आहे.

बिलांमध्ये भोंगळ कारभार
घरगुती वीज वापर क्षमतेपेक्षा अधिक बिले आल्याने वीज ग्राहक महावितरणच्या कार्यालयावर विज बिल दुरुस्तीसाठी जात असताना ग्राहकांना विज बिल दुरुस्त करून मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये महावितरणच्या भोंगळ व मनमानी कारभारामुळे प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत असून महावितरण कंपनीने तात्काळ या संदर्भात निर्णय घेतल्यास भारतीय जनता पक्षाच्या वतीने नागरिकांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून निर्देशने व आंदोलन करावे लागेल, असा इशारा भाजपातर्फे यावल तालुकाध्यक्ष उमेश फेगडे भाजपाचे शहराध्यक्ष निलेश फेगडे, हेमराज फेगडे, रितेश बारी, अजय फेगडे, परेश नाईक यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता दिलीप मराठे यांना दिलेल्या तक्रार निवेदनाद्वारे केली आहे.

Protected Content