यावल प्रतिनिधी । नागरीकांच्या सोयीसाठी तयार झालेल्या रस्त्या, गटारी, पथदिवे ले-आऊट धारकांने बंद करून अतिक्रमण केले होते. याबाबत माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत आज यावल नगरपरिषदेने लेआऊटधारकाला अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्याबाबत नोटीस बजावली आहे.
याबाबत माहिती अशी की, यावल नगरपालिकेच्या हद्दीतील माधव नगर भागातील मुख्यरस्ता गेल्या ३०ते ३५ वर्षापासून विरार नगर, गणेश नगर, एकरा नगर, रजा नगर भागातील नागरिक नगर रचना विभागाच्या मंजूर नकाशा प्रमाणे नागरीक वहीवाटीने वापरत आहे. मात्र मागील आठवड्यात अचानकपणे लेआउट धारक ॲड. अशोक गडे याने रस्त्यावर लोखंडी अँगल गाडून रस्ता अडवणूक करून रस्ता बंद केला आहे. तसेच रस्त्याला लागून नगरपरिषदेने बांधलेली कटार तोडफोड करून मातीने भराव करून बंद करून टाकली आहे. रस्ता बंद केल्याने नागरिकांना फेऱ्याने ये-येणे जाणे करावी लागत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. सार्वजनिक रस्ता बंद करून टाकल्याने नागरिकांमध्ये नगरपरिषदे बद्दल प्रचंड नाराजी व रोष व्यक्त होत आहे. हा रस्ता पूर्ववत सुरू करून रस्ता अडवणाऱ्या व गटारीची तोडफोड करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन कारवाई करणे बाबत यावल येथील गटनेते व नगरसेवक अतुल पाटील यांनी मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे यांना १८ ऑक्टोबर रोजी निवेदन दिले होते.
मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे यांनी तक्रारीची दखल घेत लेआऊट धारकाला नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, अनाधिकृत केलेले अतिक्रमण स्वखर्चाने त्वरित काढून टाकावे व रस्ता वापरासाठी मोकळा करून द्यावा असे न केल्यास नगर परिषद अधिनियमानुसार आपणावर कारवाई करण्यात येणार असून काढलेल्या अतिक्रमणाचा खर्च आपले कडून वसूल करण्यात येईल. असे पत्र यावल नगर परिषदचे प्रभारी मुख्यधिकारी अविनाश गांगोडे यांनी संबधीत अतिक्रमण धारकास बजावली आहे. दरम्यान, नगरपरिषदेने आठ दिवसात हा सार्वजनिक रस्ता खुला न केल्यास नागरिकांसह उपोषणास बसणार असल्याचा इशारा तक्रार नगरसेवक अतुल पाटील यांनी दिला आहे.