यावल, प्रतिनिधी। येथील बसस्थानकाच्या आवारात आज सकाळच्या सुमारास काही मद्यप्राशन केलेल्या किन्नर यांनी एका महिलेच्या हातातून पैसे घेऊन पाळण्याचा प्रयत्न केला असता नागरिकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, आज शनिवार (दि २९) रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास शहरातील एसटी बस स्थानकावर तीन ते चार बोगस किन्नर हे प्रवासी महिलांकडून बळजबरीने पैसे मागत असताना त्या महिलेने त्यांना पैसे देण्यासाठी काढले असता त्या बोगस किन्नर यांनी महिलेच्या हातातील सर्व पैसे घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांनी व नागरिकांनी बोगस किन्नरांना पकडून चांगला चोप दिला. नंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता ते जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा येथील राहणार असल्याचे आढळले. याबाबत अधिक माहीती घेतली असता हे बोगस किन्नर नेहमीच मद्यप्राशन करुन शहरातील नविन नागरी वसाहतीमध्ये बसस्थानकांवर व रेल्वे स्टेशनवर इतर ठीकाणी घरातील महीलांकडुन पैसे मागण्यासाठी येतात व अश्लील चाळे करून बळजबरीने महिलांकडून पैसे उकळत असतात.