यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चुंचाळे , मोहराळे, हरिपुरा, सावखेडा सिम, सातोद कोळवद व परिसरात आज दि. ३१ मे रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळाचा व अवकाळी पावसाचा तडाखा परिसराला बसलेला असून या वादळी वाऱ्यात लाखो रुपयांच्या केळी पिकांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यात आज विविध ठिकाणी झालेल्या वादळादरम्यान मुसळधार पाऊस देखील पडल्याने चुंचाळे गावासह इतर गावातील सकल भागात पाणी वाहून निघाले. तर या वादळामुळे काही ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली. तसेच आशाबाई नेमिदास वाणी, संजुसिंग राजपुत, संजय नेवे, सातोद येथील मनोज प्रेमचंद कुरकुरे यांच्या कोरपावली शिवारातील शेतात व इतर ठिकाणी केळी पिकांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अनेक ठिकाणी तरी उभी केळी आडवी पडलेली आहे.
दि. ३१मे रोजी चुंचाळे व परिसरातील गावांमध्ये सायंकाळी ५.३० ते ६ वाजेपासून वादळाला सुरुवात झाली तर जवळपास अर्धा ते पाऊण तास वादळ सुरु होते. यादरम्यान खूप जोराने सुसाट वेगाने वारा सुरू होता. वाऱ्याने गावातील व परिसरातील झाडे अक्षरश: हेलकावे खात होती. वाऱ्याचा वेग एवढा मोठा होता की काही ठिकाणी तर मोठमोठी झाडे उन्मळून पडली. वादळा दरम्यान सुदैवाने कोणासही काही इजा झाली नसल्याचे वृत्त आहे. या वादळामुळे परिसरातील शेतामधील केळी पिकांचे ही खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे. बऱ्याच ठिकाणी कापणीवर आलेली केळीचे झाडे अक्षरशः खाली जमिनीवर उन्मळून पडलेली आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कडक उन्हापासून शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील केळी पिकास कसेबसे वाचवले, मात्र आजच्या वादळामुळे ही केळी जमीनदोस्त झालेली आहे. दरम्यान, चुंचाळेसह परिसरात जवळपास अर्धा तो पाऊण तास मुसळधार पडलेल्या पावसाने रस्त्यावरून अक्षरशः पाणी वाहून निघाले तर मुख्य चौकातही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झालेला असल्याचे जाणवत आहे. मात्र, अचानक आलेल्या या वादळ व अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.