यावल जवळ दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; दोन तरूण ठार

यावल प्रतिनिधी । यावल ते भुसावळ मार्गावरील घोडेपीर बाबांच्या दर्ग्याजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन तरूण ठार झाले असून वाहन चालकाने पळ काढला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की यावल शहरातील बोरावल गेट परिसरात राहणारे दोन तरुण हे रात्री ९ .४० वाजेच्या सुमारास भुसावळहून यावल कडे एमएच १९डीएल ३०६७ या क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने येत होते. यावल शहरापासुन दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या घोडेपीरबाबांच्या दर्गा जवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात पुंडलीक चंद्रकांत सोनवणे (वय १९) व रोशन कैलास सोनवणे ( वय १८) हे जबर जखमी झाले. या जखमींना तातडीने यावल येथील ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करून जळगाव येथे पाठविण्यात आले. यात पुंडलीक चंद्रकांत सोनवणे याचा उपचार सुरू करण्याआधीच मृत्यू झाला. तर रोशन कैलास सोनवणे याचा गोदावरी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. या तरूणांच्या दुचाकीला धडक दिल्यानंतर अज्ञात वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. तर अपघात होऊन देखील बराच वेळ जखमींना कुणी मदत केली नाही. अखेर कुणी तरी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेला कॉल केल्यानंतर या तरूणांना रूग्णालयात नेण्यात आले. मात्र तोवर खूप उशीर झालेला होता.

मयत पुंडलीक हा युवक यावल येथील पत्रकार चंद्रकांत सोनवणे यांचा मुलगा असून रोशन हा त्यांच्या साडुचा मुलगा आहे. या दोन्ही तरूणांच्या मृत्यूचे वृत्त येऊन धडकताच परिसरावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, या दोन्ही युवकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Protected Content