यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील नायगाव येथील लाभार्थ्यांना तलाठी व ग्रामसेवक यांच्याकडून संजय गांधी योजनेसाठी बनावट सह्या व शिक्का मारून पैसे घेण्यात आल्याचे गंभीर प्रकार उघडकीला आले आहे. याप्रकरणी तहसीलदारांनी लाभार्थ्यांना नोटीसा बजावल्या आहेत.
याबाबत वृत्त असे की, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत श्रावण बाळ योजनेच्या लाभ घेण्यासाठी तालुक्यातील नायगाव येथील बत्तीस लाभार्थ्यांची प्रकरणे तहसील कार्यालयामध्ये दप्तरी सादर करण्यात आले. ही प्रकरणे तपासणी व पडताळणीसाठी नायगावच्या तलाठीकडे पाठविले असता सदर प्रकरणांवरील सह्या व शिक्के बनावट असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान ही प्रकरणे बनावट असल्याचे निदर्शनास आल्याने तहसीलदार महेश पवार यांनी सदर बाब गांभीर्याने घेत संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान सदर प्रकरणे कोणत्या ई-सेवा केंद्रामार्फत तयार करण्यात आली, बनावट शिक्के व सह्या कोणी मारल्या यासह , तालुक्यातील अन्य कोणत्या गावातील अशी बनावट प्रकरणे कार्यालयात सादर झाली आहे. याबाबतही चौकशी व्हावी अशी मागणी ठिकठिकाणाहून करण्यात येत आहे.