Home Cities यावल यावलच्या बाल संस्कार विद्या मंदिरात संस्कृत सप्ताहाचा शुभारंभ

यावलच्या बाल संस्कार विद्या मंदिरात संस्कृत सप्ताहाचा शुभारंभ

0
3


यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील बाल संस्कार विद्या मंदिरात २४ ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या संस्कृत सप्ताहाचा विद्यार्थ्यांच्या मोठ्या उपस्थितीत आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी अत्यंत उत्साहात शुभारंभ करण्यात आला. संस्कृत भाषेविषयी विद्यार्थ्यांच्या मनात आवड निर्माण व्हावी तसेच दैनंदिन व्यवहारात या प्राचीन भाषेचा वापर वाढावा, या मुख्य उद्देशाने या विशेष सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी सर्व सादरीकरणे पूर्णपणे संस्कृत भाषेत केली. प्राथना, श्लोक उच्चारणापासून ते सुविचार, संस्कृत संभाषण, संख्या गीत, लघुकथा आणि प्रभावी भाषणांपर्यंत विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले. विद्यार्थ्यांच्या या आत्मविश्वासाने आणि अभ्यासपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकून घेतली.

समारंभास भुसावळ येथील श्रीश चिपळोणकर व आशीष सैतवाल हे प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचे महत्त्व अत्यंत सोप्या शब्दांत समजावून सांगितले. तसेच संस्कृतचा सराव अधिक आनंददायी व्हावा यासाठी विविध मनोरंजक खेळ घेऊन विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला. दैनंदिन जीवनात संस्कृत बोलण्याचे आवाहन करत त्यांनी विद्यार्थ्यांना या भाषेचे व्याकरण आणि सौंदर्य समजावून सांगितले.

या उपक्रमामुळे शाळा परिसरात एक आगळेवेगळे संस्कृतमय वातावरण तयार झाले आहे. विद्यार्थ्यांमधील हा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी यापुढे दर शनिवारी शाळेत संस्कृत खेळ व गाण्यांचे विशेष सत्र आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सुनील माळी, पालक दिनेश मुळे, सरिता गायकवाड, अतुल पवार यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

“संस्कृतं संस्कृतेर्मूलम्” या उदात्त भावनेचा संदेश देत बाल संस्कार विद्या मंदिरात सुरू झालेला हा संस्कृत सप्ताह विद्यार्थ्यांसाठी भाषा समृद्धीची नवी दिशा ठरत आहे.


Protected Content

Play sound