मुंबई : वृत्तसंस्था । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात यंदा फटाक्यांवर बंदी घालण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. आरोग्य विभागाने प्रस्ताव तयार केला असून तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. फटाकेमुक्त दिवाळीसाठी आग्रही असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
टोपे म्हणाले, “दिवाळी तोंडावर आलेली असताना यावेळी आपल्याला फटाकेमुक्त दिवाळी कशी साजरी करता येईल, ही मानसिकता आत्तापासून ठेवणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा मी याबाबत आग्रह धरणार आहे. फटाक्यांच्या धुरामुळे विषारी वायू हवेत सोडले जातात, थंडीमुळे हे वायू वर जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे श्वसनाला अधिक जास्त बाधा निर्माण होऊ शकते.”
राज्य मंत्रिमंडळात चर्चा झाल्यास राजस्थान, ओरिसा आणि सिक्कीम पाठोपाठ महाराष्ट्रात दिवाळीत फटाक्यांवर बंदी घातली जाऊ शकते. याबाबत टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीत चर्चा झाली आहे. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत यंदा फटाकेबंदी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
दिवाळी सण लक्षात घेता नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगावी. मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टंसिंग पाळावे, हात सातत्याने धुत रहावे या उपाययोजनांचा अवलंब करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावर निर्बंध आणले आहेत. कोणी अशा ठिकाणी फटाके फोडताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मरिन ड्राईव्ह, जुहू बीच, वरळी सी फेस यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडता येणार नाहीत. सोसायटी आणि घराच्या आवारातच मर्यादित स्वरुपात फटाके फोडण्यास परवानगी असेल.
एकाच ठिकाणी जास्त प्रदूषण झालं तर कोरोनाच्या संसर्गात वाढ होऊ शकते, लोकांची ऑक्सिजनची पातळी खालावू शकते, त्यामुळे लोकांना स्वतःहून यावर निर्बंध घालणे गरजेचे असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.