बायडेन यांचा विजय झाल्यास पाकिस्तानला फायदा

वाशिंग्टन : वृत्तसंस्था । बायडेन यांचा विजय झाल्यास भारताचा शेजरी देश असणाऱ्या पाकिस्तानला फायदा होण्याची शक्यता आहे. बायडेन यांच्या विजयाची शक्यता अधिक असल्याने पाकिस्तानलाही आता अमेरिकेबरोबरच संबंध सुधारण्याची आशा वाटू लागली आहे

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक खूपच चुरसीची झाली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये काँटे की टक्कर पहायला मिळत आहे. मात्र बायडेन यांचा या निवडणुकीमध्ये विजय होणार असं निश्चित मानलं जात आहे. दुसऱ्या दिवशी मतमोजणी सुरु असून बायडेन हे विजयापासून अवघ्या काही मतांनी दूर आहेत.

. बायडेन हे आधीपासूनच पाकिस्तान समर्थक नेते आहेत. बायडन यांना पाकिस्तानमधील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कारही प्रदान करण्यात आलाय. २००८ मध्येच बायडेन यांना ‘हिलाल-ए-पाकिस्‍तान’ने सन्मानित करण्यात आलं आहे. पाकिस्तानला अमेरिकेने आर्थिक मदत करायला हवी असं मत असणाऱ्या मोजक्या अमेरिकन नेत्यांमध्ये बायडेन यांचा समावेश होतो.

२००८ साली बायडेन यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच पाकिस्तानला दरवर्षी अडीच बिलियन डॉलरची आर्थिक मदत देण्यास अमेरिकेने सहमती दर्शवली होती. सीनेटमध्ये पाकिस्तानला मदत करण्यासंदर्भातील हा प्रस्ताव बायडेन आणि रिचर्ड लुगर यांनी मांडला होता. तत्कालीन पाकिस्तानी राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांनी ‘कायम पाकिस्तानच्या सोबत उभं राहिल्याबद्दल’ बायडेन यांचे आभार मानले होते.

पाकिस्तानी हा दहशतवादाचा फटका बसलेला देश असून त्याला यामधून सावरण्यासाठी आर्थिक मदत केली पाहिजे असं बायडेन यांचं मत आहे.

पाकिस्तानमधील राजकीय जाणकारांच्या मते बायडेन व्हाइट हाऊसमध्ये गेल्यास कर्जाच्या ओझ्याखाली अडकलेल्या पाकिस्तानला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बायडन आपल्या परराष्ट्र धोरणांमध्ये पाकिस्तानबरोबरचे संबंध आणखीन सुधारण्यासाठी पुढाकार घेतील अशी अपेक्षा पाकिस्तानी राजकीय तज्ज्ञांना आहे.

पाकिस्तानी लष्करामधून निवृत्ता झालेले लेफ्टिनंट जनरल आणि राजकीय विषयांवरील अभ्यास असणाऱ्या तलक मसूद यांनी बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यास अमेरिका आणि पाकिस्तानमधील संबंध पुन्हा सुधरतील. बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यास त्याचा फायदा आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा आणखीन बळकट करण्यासाठीही होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.

Protected Content