म्युच्युअल फंडांच्या मत्ता २८.२ लाख कोटी रुपयांवर

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या अहवालानुसार दहा वर्षांमध्ये म्युच्युअल फंडांच्या एकूण मत्तेमध्ये ४.४ पटींची वाढ होऊन ऑक्टोबर २०२०मध्ये ती २८.२ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ऑक्टोबर २०१०मध्ये ही मत्ता ६.५ लाख कोटी रुपयांवर होती.

दशकभरात म्युच्युअल फंड उद्योगाची भरभराट झाली. ग्राहकांच्या संख्येतही मोठी वाढ नोंदविण्यात आली म्युच्युअल फंडांच्या इतिहासात प्रथमच एकूण मत्ता २८ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी ती २७ लाख कोटी रुपयांच्या घरात होती. सप्टेंबर २०२०च्या तुलनेत फंडांच्या मत्तेमध्ये ऑक्टोबर २०२०मध्ये ५.१ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.

इक्विटी म्युच्युअल फंडांची मत्ता सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये १.६ टक्क्यांनी वाढून ८.२ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. त्यामध्ये ईएलएसएस आणि इंडेक्स फंडांचाही समावेश आहे. शेअर बाजारांमधील निर्देशांकांमध्ये वाढ झाल्याने इक्विटी योजनांच्या विक्रीत वाढ झाल्याने एकूण मत्तेतही वाढ नोंदविण्यात आली आहे. इक्विटी योजनांच्या विक्रीत दरमहा आधारावर २.१ टक्क्यांची वाढ होऊन एकूण मत्ता १८३ अब्ज रुपयांवर पोहोचली आहे. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये निफ्टीमध्ये साडेतीन टक्क्यांची तेजी दिसून आली आहे.

सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये म्युच्युअल फंडांच्या रिडम्प्शनमध्ये १९.९ टक्क्यांची वाढ होऊन ही रक्कम २२२ अब्ज रुपयांवर गेली आहे. गेल्या ३१ महिन्यांतील ही उच्चांकी वाढ आहे. ऑक्टोबरमध्ये ३९ अब्ज रुपये म्युच्युअल फंडांतून काढून घेण्यात आले. सलग चौथ्या महिन्यात फंडांतून मोठ्या प्रमाणात रक्कम काढून घेण्यात आली. ऑक्टोबरमध्येही फंडांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली. या कालावधीत एसआयपींच्या माध्यमातून २७ अब्ज रुपयांची गुंतवणूक झाली.

Protected Content