यावल , प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मोहराळा येथे कोविड लसीकरणास नागरिकांनी गर्दी केली होती.
दोन दिवसापासून यावल शहरासह तालुक्यातील अनेक केंद्रांवर लसीचासाठा संपल्याने लसीकरण मोहीम बंद होती. मंगळवार रोजी कोविशील्ड लसीचे डोस प्राप्त झाल्याने ही मोहीम बुधवारी पुन्हा सुरू झाली. परंतु बुधवार रोजी एकाच दिवसात लसीचा साठा संपल्याने पुढील लस साठा येईपर्यंत पुन्हा लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासीम व या अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र मोहराळा, दहिगाव, कोळवद, व सातोद येथे नागरिकांना गावपातळीवरच लसीकरण सेवा उपलब्ध व्हावी म्हणून आवश्यकतेनुसार व लस साठा उपलब्धतेनुसार कोविड लसीकरणाचे आयोजन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे व डॉ.नसीमा तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका शोभा चौधरी व आरोग्य सहाय्यक एल. जी. तडवी हे करीत आहेत. प्रा. आ. उपकेंद्र मोहराळा येथे कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. १८ वर्षावरील तरुण-तरुणींनी लसीकरण केंद्रावर गर्दी केली होती. तर काही नागरिकांना लस संपल्याने परत जावे लागले.
१८ वर्षावरील व ४५ वर्षावरील मोहराळा येथे १०८ व सावखेडासिम येथे १०८ असे २१६ नागरिकांना लस देण्यात आली. यावेळी दुसऱ्या डोसला पात्र नागरिकांनाही लसीचा दुसरा डोस देण्यात आला. लसीकरणप्रसंगी सरपंच नंदा महाजन, उपसरपंच जहांगीर तडवी यांची प्रमुख उपस्थिती होती. समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. खालीद शेख, आरोग्य सहाय्यक एल. जी. तडवी, आरोग्यसेवक बालाजी कोरडे, आरोग्य सेविका शाबजान तडवी, व कल्पना पाटील ह्या आरोग्य पथकाने लसीकरण मोहीम राबविली. स्पॉट रजिस्टेशन बालाजी कोरडे यांनी केले. शिबिरास आशासेविका निर्मला पाटील व योगिता पाटील यांचे सहकार्य लाभले.