जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोलाणी मार्केट येथील श्री एसएसडी मोबाईल या दुकानात चोरट्यांनी महागडे ६ मोबाईल, ॲपल वॉच तसेच इतर साहित्य असा एकूण ६ लाख २६ हजारांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवार, २१ रोजी सायंकाळी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरात गणेश नगरात विनीत कैलासकुमार आहुजा हे वास्तव्यास आहेत. त्यांचे गोलाणी मार्केट येथे वाघ चेंबर दुकान २ येथे श्री एस एस डी मोबाईल नावाचे दोन मजली दुकान आहे. विनीत व त्यांचा लहान भाऊ रोहित हे दोघे दुकान सांभाळतात २० सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता रोहित आहुजा हे दुकान बंद करुन घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी बुधवार, २१ सप्टेंबर रोजी आहुजा यांच्या दुकानाच्या शेजारी असलेल्या ऑल ईन वन स्टोअर्सचे चे मालक जयेश पोपटानी यांनी विनीत आहुजा यांना फोन करुन त्यांच्या दुकानाचे गेटचे लॉक तोडले असल्याचे दिसत असून दुकानात चोरी झाल्याचे सांगितले. त्यानुसार विनीत व त्यांचा भाऊ यांनी दुकानाकडे धाव घेतली. पाहणी केली असता, दुकानातील चॅनल गेटच्या लॉकच्या पट्टया तोडून शॉपमध्ये प्रवेश करत चोरट्यांनी वरच्या मजल्यावरील शॉपमधून विक्रीस असलेले महागडे सहा मोबाईल , दोन ॲपल वॉच , एक एअर पॉट तसेच डीव्हीआर बॉक्स तसेच ६ हजार रुपयांची रोकड असा एकूण ६ लाख २६ हजारांचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे समोर आले. याबाबत विनीत आहुजा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात दोन चोरट्यांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.