मोदी सरकार अंबानी-अदानीसाठी काम करतंय — मेधा पाटकर

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । “मोदी सरकार पुढच्या निवडणुकीसाठी फंडची तयारी करत आहे. केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्यांचा आम्ही विरोध करतो. उद्योगपती अंबानी-अदानी यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत , असा आरोप मेधा पाटकर यांनी केला आहे

शेतकरी एकीकडे हमी भाव मागतो, ते तुम्ही देत नाही आणि अशा कंपन्यांना धान्य साठ्याची साठेबाजी करण्याचं कट आखताय?”, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केला.

“कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हे देशासाठी घातक आहे. ही शेतकऱ्यांची आत्महत्या नाही हत्या आहे. आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. आंदोलन सुरुच राहणार. १८ आणि २० जानेवारीला आणि पुढेही महिला आंदोलनात सक्रीय होतील”, असं मेधा पाटकर म्हणाल्या.

“हे मोठमोठे गोडाऊन बनवत आहेत. हे कायदा थोपवण्याचं काम करत आहेत. भूक, तहाण भागवणारा हा शेतकरी दर १७ मिनिटाला आत्महत्या करतोय. हे आंदोलन नव्या स्वातंत्र्यासाठी होत असलेलं आंदोलन आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मेधा पाटकर यांनी शेतकरी प्रश्नांवरुन राज्य सरकारला देखील आवाहन केलं. “राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकर करावी. केंद्राच्या विरोधात आंदोलन करूनही राज्य सरकार, पोलीस आंदोलकांना का अडवतात, लाज वाटायला हवी. राज्य सरकारने आंदोलकांना तुकडे तुकडे करुन का पाठवलं?”, असा सवाल त्यांनी केला

Protected Content