पोलीस निवासस्थानाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार — आ. किशोर पाटील

 

पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा, भडगाव व नगरदेवळा येथील पोलिस स्थानकात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. याबाबत आमदार किशोर पाटील पाठपुरावा केला असता गृह राज्यमंत्री शंभू देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत लवकरच हा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे संकेत मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना संक्रातीच्या पार्श्वभूमीवर गोड बातमी मिळाली आहे.

पाचोरा भडगाव मतदार संघातील पोलिस कर्मचाऱ्यांना स्वच्छ, सुंदर व सुसज्य असे निवासस्थान मंजूर व्हावे यासाठी आमदार किशोर पाटील हे गेल्या ४ वर्षांपासून पाठपुरावा करीत होते. या पाठपुराव्याला यश मिळाले असून गृह राज्य मंत्री ग्रामीण ना. शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी शालेय मंत्री बच्चू कडू, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार रमेश बोरनारे, आमदार अनिल बाबर, महाराष्ट पोलीस गृह निर्माण व कल्याण महांडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन बिहारी, अतिरिक्त पोलिस महासंचालक एस. जगनाथन, उप सचिव व्यंकटेश भट, सुनिल बागुल, हरेश्वर सहाणे, स्वीय्य सहायक राजु पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी पाचोरा भडगाव मतदार संघातील पाचोरा व नगरदेवळा येथील निवासस्थान पहिल्या टप्प्यात करावी असा निर्णय घेण्यात आला असून यानंतर पोलीस कार्यालयाची निर्मिती होणार आहे. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या पोलिसांच्या निवास्थानाचा प्रश्न मार्गी लागल्याने मतदार संघातील पोलीस कर्मचाऱ्यांकडून आमदार किशोर पाटील यांचे अभिनंदन होत आहे.

Protected Content