मोदी , शहांना घरी पाठवणे एवढेच लक्ष्य — नाना पटोले

 

पुणे : वृत्तसंस्था । पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित  शहा यांना घरी पाठवणे एवढेच आमचे लक्ष्य  असल्याचे आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे

 

राज्यात एकीकडे नाना पटोलेंनी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार म्हणत महाविकासआघाडीमघ्ये खळबळ उडवून दिली असताना दुसरीकडे त्यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. “मागील ७० वर्षांत काँग्रेस पक्षाने मोठ्या कष्टाने देश आणि व्यवस्था उभी केली. मात्र या सरकारने सात वर्षांत एक एक कंपनी, संस्था विकत आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत दिल्लीतील दोन्ही दाढीवाल्यांचे शटर बंद करायचे आहे. एवढंच आपल लक्ष्य आहे”, असं नाना पटोले म्हणाले आहेत. पुण्यात काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

 

नाना पटोले म्हणाले की, “केंद्र सरकारने ज्यावेळी देशात नोटबंदी आणली तेव्हा अनेक जण बॅंकेच्या रांगेत उभे राहिले. या रांगेत असंख्य निष्पाप नागरिकांचा बळी गेला. पण त्याचदरम्यान गोव्यात एका कार्यक्रमात पंतप्रधान म्हणजेच आता नकली दाढी वाढवलेल्या व्यक्तीने सांगितलं होतं, की मला ५० दिवस द्या. जर नोटबंदी फसली, तर मला कोणत्याही चौकात आपण द्याल ती शिक्षा हा प्रधानसेवक घेण्यास तयार आहे. मग आता त्याचं काय झालं?” असा सवाल उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. “खोटं बोल, पण रेटून बोल, असे लोक सत्तेमध्ये आले असून मागील सात वर्षांत जी व्यवस्था काँग्रेस पक्षाने उभी केली होती. ती सध्याच्या केंद्रातील सत्ताधारी पक्षाने मोडकळीस आणली”, असल्याचा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला.

 

यावेळी नाना पटोले यांनी मोदींसोबत झालेल्या भांडणाविषयी सांगितलं. “नोटाबंदीनंतर, जीएसटी आणण्याचा प्रयत्न केला गेला. जीएसटीमुळे सर्वसामान्यांचे जीवनमान सुधारेल असे सांगितले. पण माझ्या लक्षात आलं आणि त्याला मी विरोध केला. हे आमचे शेतकरी, मध्यमवर्गीय यांच्यासाठी नाही. हा तुमच्या मूठभर लोकांसाठी नोटबंदीसारखा कायदा आहे, असं मी सांगितलं. यावरून माझं आणि त्यांचं आमनेसामने भांडण झालं. असं नाना पटोले यांनी सांगितलं.

 

Protected Content