मुंबई वृत्तसंस्था । ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनात आणले तर अशक्य ते शक्य होण्याचा हा कालखंड आहे,’ अशा शब्दांत कौतुक करत, मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारनं निर्णय घ्यावा, असं अप्रत्यक्ष आवाहन शिवसेनेनं केलं आहे. ‘मराठा व धनगर आरक्षणाचा प्रश्न घेऊन भाजपच्या नेत्यांनी मोदींचे मन वळवायला हवे,’ असा सल्लाही शिवसेनेनं दिला आहे.
राज्य सरकारनं दिलेल्या मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यापासून मराठा समाजात अस्वस्थता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कोल्हापूर व सातारा येथील वंशज संभाजीराजे व उदयनराजे आपापल्या परीनं या लढ्याला बळ देत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल तर सर्वांचेच आरक्षण रद्द करा, अशी भूमिका उदयनराजे यांनी मांडली आहे.
, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आड येणाऱ्यांना ठोकून काढा, असे संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. वातावरण स्फोटक बनलेलं असताना आरक्षणाला स्थगिती मिळण्यासाठी विरोधी पक्ष राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोष देत आहे. या सगळ्याच्या अनुषंगानं शिवसेनेनं भूमिका मांडली आहे. उदयनराजे व संभाजीराजेंच्या भूमिकांतून वेगळे अर्थ काढण्याची गरज नाही. आपापल्या स्वभावानुसार त्यांनी मतं व्यक्त केली आहेत.
कोल्हापूर तसेच सातारच्या छत्रपतींनी आता घेतलेल्या भूमिका या मूळच्या शिवसेनेच्याच आहेत. हात जोडून न्याय मिळत नसेल तर हात सोडा, अन्याय करणाऱ्यांना ठोकून काढा असे संभाजीराजे म्हणतात. ही भूमिका शिवसेनेचीच आहे, पण या प्रश्नी नक्की कोणाला ठोकायचे याचे उत्तर मिळायला हवे, अशी अपेक्षा शिवसेनेनं व्यक्त केली आहे. या प्रश्नावर सरकारला दोष देणाऱ्या विरोधकांचा मात्र शिवसेनेनं समाचार घेतला आहे.
‘आरक्षणास स्थगिती मिळाल्याचे खापर राज्यातील विरोधी पक्षांचे लोक सध्याच्या सरकारवर फोडत असतील तर ते सकल मराठा समाजाशी द्रोह करीत आहेत. ही वेळ एकमेकांवर दोषारोप करण्याची नाही, तर एकमेकांच्या मांडीस मांडी लावून, खांद्यास खांदा भिडवून मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाचा गुंता सोडवण्याची आहे. भाजप नेत्यांनी हा प्रश्न घेऊन पंतप्रधान मोदींचे मन वळवायला हवे. सध्या मोदी यांनी मनात आणले तर अशक्य ते शक्य होण्याचा कालखंड आहे, पण ‘मराठा आरक्षणाची कोंडी फोडण्यासाठी वेळ द्या’ असे पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवूनही वेळ मिळत नसेल तर राज्यातील भाजप पुढाऱ्यांना महाविकास आघाडीस दोष देण्याचा अधिकार नाही,’ असं शिवसेनेनं सुनावलं आहे.
‘मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर ढोल वाजविले ते कशासाठी? पवार हे स्वतः मराठा समाजाचेच प्रतिनिधी आहेत व फडणवीसांचे सरकार राज्यात असताना पवार मराठा मोर्चात सामील झाले होते,’ याची आठवणही शिवसेनेनं या निमित्तानं दिली आहे.