मुंबई वृत्तसंस्था । कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनच्या काळात जगभरात आतापर्यंत अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात. याच दरम्यान ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन आता भारतात २० हजार तात्पुरत्या स्वरुपाच्या नोकऱ्या उपलब्ध करणार आहे, अशी घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. या नोकऱ्या कंपनी ग्राहकांच्या सेवेनुसार देणार आहे. या सर्व नव्या नोकऱ्या देशातील हैद्राबाद, पुणे, नोएडा, कोलकत्ता, जयपूर, चंदीगढ, मंगळूर, इंदोर, भोपाळ, कोइम्बतुर आणि लखनऊ या ११ शहरात दिल्या जाणार आहेत.
अॅमेझॉन व्हर्चुअल कस्टमर सर्व्हीस प्रोग्राम यामध्ये असणार आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या वेळेनुसार काम करुण्याची सुविधा मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना ग्राहकाची गरज समजून घेऊन घर बसल्या त्यांच्यासाठी उपयोगी कस्टमाईज्ड सुविधा पोहचवणे गरजेचे आहे. या सर्व सर्व्हीस ई-मेल, मेसेज, सोशल मीडिया आणि फोनच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाईल.
“या नोकऱ्यांसाठी कुणीही अर्ज करु शकता. अर्जदार दहावी पास असणे अनिवार्य आहे. त्यासोबत त्याला इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलुगू, आणि कन्नड भाषां लिहिता, वाचता येणे गरजेचे आहे. कंपनीने स्पष्ट सांगितले आहे की, या नोकऱ्या तात्पुरत्या असणार आहेत. कंपनीच्या गरजेनुसार आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर वर्षाच्या शेवटी त्यांना परमनेंट केले जाऊ शकते”, असं अॅमेझॉन इंडियाने सांगितले.