मे महिन्यातच ६४ लाख ६८ हजार ३८८ लोकांना कोरोनाची बाधा

नवी दिल्ली  वृत्तसंस्था । भारतावर कोरोना संक्रमणाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असताना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) केलेल्या देशव्यापी सीरो सर्वेक्षणात मे महिन्यात ६४ लाख ६८ हजार ३८८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. १८ ते ४५ वयोगटातील लोकांना सर्वाधिक बाधा झाल्याचे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

मेच्या सुरुवातीला एकूण लोकसंख्येच्या ०.७३ टक्के लोकांना बाधा झाली असावी, असे या राष्ट्रीय सीरो सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून स्पष्ट झाले आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये एकही प्रकरण नव्हते त्या जिल्ह्यांमध्येही संसर्ग झाल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. या सर्वेक्षणाने ग्रामीण भागावर भर दिला होता.

देशातील २१ राज्यांच्या ७० जिल्ह्यांमध्ये ७०० गाव आणि वार्डांमध्ये ११ मे ते ४ जूनदरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले होते. चार स्तरांमध्ये करण्यात आलेल्या या सर्वेक्षणातील २५.९ टक्के म्हणजे १८१ भाग शहरी होते, करोना प्रकरणांची शून्य, किमान, मध्यम आणि सर्वाधिक अशा चार श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली होती. त्यात १८ वर्षांवरील प्रौढांचे नमुने घेण्यात आले होते. सर्वेक्षणानंतर तीन महिन्यांनी त्याचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. या अभ्यासासाठी २८ हजार जणांची नोंदणी करण्यात आली होती.

देशातील एकूण रुग्णसंख्या ४५ लाख ६२ हजार ४१४वर पोहोचली असून, एकूण ७६ हजार २२१ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात ९६ हजार ५५२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून १,२०९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर बरे झालेल्यांची संख्या ३५ लाखांवर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Protected Content