जळगाव प्रतिनिधी । मेहरूणमध्ये कोरोनाचा पॉझिटीव्ह रूग्ण आढळला असला तरी परिसरातील जनतेने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सांगत महापौर भारतीताई सोनवणे आणि ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे यांनी रात्रीच या भागाला भेट देत लोकांना आश्वस्त केले.
हे देखील वाचा : शॉकींग : जळगावात आढळला कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण
मेहरूण परिसरातील एका नागरिकाची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली असून परिसरातील जनतेत धास्तीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमिवर, परिसरातील नागरिकांनी थेट नगरसेवकांचे घर गाठून परिसर निर्जंतुकीकरण करण्याची मागणी केली होती. माहिती समजताच महापौर भारती सोनवणे व नगरसेवक कैलास सोनवणे यांनी लागलीच मेहरूण परिसर गाठला. रात्री अकरा वाजता देखील बाहेर जमाव करून उभे असलेल्या नागरिकांना त्यांनी घरात थांबण्याचे आवाहन केले. महापौरांनी मनपा आयुक्तांना फोन करून आरोग्य विभागाची पूर्ण यंत्रणा रविवारी मेहरूण परिसर निर्जंतुक करण्यासाठी पाठविण्याचे सांगितले. दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी बाळगावी आणि प्रशासनाकडून दिल्या जाणार्या सूचनांचे योग्य पालन करावे, असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले. तसेच, रुग्णाच्या नातेवाईकांना देखील महापौरांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले.
हे देखील वाचा : कोरोनाची एंट्री : आता जळगावकरांची खरी परीक्षा !