मुस्लीम धर्मगुरुचे नागरिकत्व काढले

कॅनबेरा : वृत्तसंस्था । ऑस्ट्रेलियाने अल्जेरियामधील एका मुस्लीम धर्मगुरुचे नागरिकत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या धर्मगुरुने २००५ साली मेलबर्नमधील एका फुटबॉल सामन्यामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्यावर होता.

स्फोट घडवून आणणाऱ्या गटाचे नेतृत्व केल्याने धर्मगुरुला दोषी ठरवण्यात आलं आहे. अब्दुल नसीर बेनब्रीका असं या व्यक्तीचं नाव आहे. ऑस्ट्रेलियात राहूनही देशाने नागरिकत्व काढून घेतलेला नसीर हा पहिलाच व्यक्ती ठरला आहे. सामान्यपणे एखाद्या व्यक्तीकडे दोन देशांचे नागरिकत्व असल्याचे सिद्ध होते तेव्हाच ऑस्ट्रेलियामध्ये नागरिकत्व रद्द करण्याचा कायदा आहे.

देशाचे गृहमंत्री पीटर डटन यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही व्यक्तीपासून देशाला दहशतवादी धोका असल्याचे सिद्ध झाल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येते. नसीरविरोधात दहशतवादाची तीन प्रकरणं होती. दहशतवादी संघटना चालवणे, दहशतवादी संघटनेचा भाग असणं आणि दहशतवादी हल्ल्याची योजना आखणे या प्रकरणामध्ये नसीरला दोषी ठरवण्यात आलं आहे.

नसीरला १५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तुरुंगवासाची शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही खटला सुरु असल्याने त्याला तुरुंगातच ठेवण्यात आलं आहे. देशातील दहशतवादी कायद्यानुसार शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही कोणत्याही व्यक्तीला पुढील तीन वर्षांसाठी तुरुंगामध्ये ठेवता येते. नसीरच्या वकीलांनी या विरोधात याचिका दाखल केली आहे. त्याचा व्हिसा रद्द करुन त्याला अल्जीरियाला पाठवण्याच्या निर्णयाविरोधात अर्ज करण्यासाठी ९० दिवसांचा वेळ देण्यात आला आहे.

Protected Content