मुंबई (वृत्तसंस्था) मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला शिवसेनेची सहमती आहे असे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी सांगितले. पण बाबासाहेबांच्या घटनेनुसार धर्माच्या नावानुसार आरक्षण देता येणार नाही. धर्माच्या आधारावर मुस्लिम आरक्षण दिल्याने मराठा आणि ओबीसी आरक्षणही अडचणीत येईल, असा आक्षेप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी घेतला आहे.
फडणवीस पुढे म्हणाले की, संविधानात धर्माच्या आधारे आरक्षण दिले जाऊ शकत नाही. काही राज्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र सुप्रीम कोर्टाने ते नाकारले आहे. एसी, एसटीचे आरक्षण लोकसंख्येच्या आधारे आहे. त्यानंतर उरलेले आरक्षण ५० टक्क्यांपर्यंत ओबीसीला मिळते. जर अधिकचे आरक्षण दिले, तर तेवढे टक्के आरक्षण कमी करावे लागेल. त्यामुळे ओबीसीसह मराठा आरक्षणही अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेना आणि इतर पक्षात असे काय सेटिंग झालंय हे शिवसेनेने सांगायला हवे. मंत्री ज्यावेळी उत्तर देतात तेव्हा सरकारकडून बोलत असतात. शिवसेनेने आपली सगळी तत्वे बाजूला ठेऊन कशा-कशात सेटिंग केली, हे एकदा जाहीर करावे, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.