मुलांना सप्टेंबरपासून कोरोना लस देण्याची शक्यता

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । सप्टेंबरपासून मुलांचं कोरोना लसीकरण सुरु होईल, अशी आशा आहे”, असं एम्सचे प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं.

 

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी प्रभाव कमी झालेला नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेचं संकट कायम आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर सर्वाधिक प्रभाव पडेल, असं जाणकारांचं म्हणणं आहे. त्यामुळे प्रशासनाने लसीकरणावर जोर दिला आहे.

 

काही दिवसांपासून भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचं लहान मुलांवर क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. याबाबत सप्टेंबरपर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लहान मुलांना सप्टेंबर महिन्यापासून लस देण्याची शक्यता आहे.

 

“कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुलांचं लसीकरण करणं गरजेचं आहे. जायडस कॅडिलाने ट्रायल केलं आहे आणि आपतकालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच ट्रायल ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात पूर्ण होईल. दुसरीकडे फायझरच्या व्हॅक्सिनला अमेरिकेत मंजुरी देण्यात आली आहे.

 

 

“येणाऱ्या काही आठवड्यात लसीचे डोस उपलब्ध झाले पाहीजेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरु केल्या पाहीजेत. यामुळे मुलांना अधिक सुरक्षा मिळेल आणि पालकांनाही आपली मुलं सुरक्षित असल्याचा दिलासा मिळेल.” असं डॉ गुलेरिया यांनी सांगितलं.

 

देशात आतापर्यंत १८ वर्षांवरील ४२ कोटीहून अधिक लोकांना लसीचा किमान एक डोस दिला गेला आहे. आतापर्यंत देशातील ६ टक्के लोकांना लस देण्यात आली आहे. या वर्षाच्या अखेरीस १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. यासाठी दिवसाला १ कोटी लस देणं गरजेचं आहे. मात्र सध्या ४० ते ५० लाख डोस दिले जात आहेत. आठवड्याच्या शेवटी लसीकरण मोहीम थंडावत असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे अनेक देशांनी लहान मुलांना लस देण्यासाठी आपतकालीन मंजुरी दिली आहे. मात्र भारतात अजुनही मंजुरी देण्यात आलेली नाही.

 

Protected Content