नवी दिल्ली : वृत्तसंस्था । केंद्राने लहान मुलांच्या लसीकरणावरुन सुरु असणाऱ्या राजकारणावरही नाराजी व्यक्त केलीय.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांना बसणार असल्याची भीती व्यक्त केली जात असतानाच लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भातील चर्चाही सुरु झाल्या आहेत. आता केंद्र सरकारने दावा केला आहे की जगातील कोणत्याच देशामध्ये लहान मुलांचं लसीकरण करण्यात आलेलं नाही. लवकरच लहान मुलांवरील लसीच्या चाचण्यांची सुरुवात होणार आहे.
केंद्र सरकारने गुरुवारी भारतामधील लसीकरण मोहीमेसंदर्भातील गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने पत्रक जारी केलं आहे. हे पत्रक निती आयोगाच्या आरोग्य विभागाचे सदस्य आणि लसीकरणासंदर्भातील राष्ट्रीय समितीचे प्रमुख विनोद पॉल यांच्या नावाने जारी करण्यात आलं आहे. या पत्रकानुसार जागतिक आरोग्य संघटनेने लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात कोणताही सल्ला दिलेला नाही. देशामध्ये दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजलेला असतानाच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त केलाय. या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण वाढेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या लसीकरणाचा विषय चर्चेत आलाय. मात्र मुलांच्या लसीकरणासंदर्भातील चाचण्या लवकरच सुरु होणार असल्याचं केंद्राने स्पष्ट केलं आहे. वर्षाअखेरीसपर्यंत २०० कोटींहून अधिक लसींचे डोस भारतीयांसाठी उपलब्ध असतील असंही केंद्राने म्हटलं आहे.
मुलांच्या लसीकरणासंदर्भात सरकारने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार चाचण्यांनंतर योग्य निरिक्षणे आणि माहिती उपलब्ध झाल्यावर देशातील वैज्ञानिकांच्या मदतीने लस निर्मितीचं काम हाती घेतलं जाईल. व्हॉट्सअप ग्रुपवरील भीती पसरवणाऱ्या मेसेजेच्या आधारे लसीकरण मोहीमेबद्दल निर्णय घेता येणार नाही. राजकीय नेते या मुद्द्यावरुन राजकारण का करत आहेत, असा प्रश्न केंद्राने उपस्थित केलाय.
भारत बायोटेक दोन ते १८ वर्षांच्या मुलांसाठीच्या लसीच्या चाचण्यांचा दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनीकल ट्रायल जून महिन्यामध्ये सुरु करणार आङेत. काही दिवसांपूर्वी कंपनीला दोन ते १८ वर्षांच्या मुलांवर चाचण्या करण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारत बायोटेक आणि इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने संयुक्तरित्या ही लस बनवली आहे.
फायझर या अमेरिकन कंपनीने त्यांची लस १२ वर्षांवरील व्यक्तींना देता येऊ शकते असं म्हटलं आङे. कॅनडामध्ये १२ ते १५ वर्षांच्या मुलांना फायझरची लस देण्यास पवानगी दिलीय.