वरणगाव, दत्तात्रय गुरव । विवाह समारंभ हा अनेकांच्या साक्षीने संपन्न होत असतो. कोरोनामुळे अनेक निर्बंध आल्याने आता मोजक्यांच्या उपस्थितीतच उरकतो. पण सध्या चर्चा आहे ती एका अनोख्या विवाह सोहळ्याची. वरणगाव येथे मुलगी पाहायला आले आणि थेट लग्नच करून घेऊन गेले, हा अनोखा विवाह समारंभ सर्वत्र चर्चेचा व कौतुकाचा विषय ठरला आहे.
याबाबत माहीती अशी की, वरणगाव येथील हिना पार्कमध्ये राहणारे शेख एजाज शेख गुलाम नबी त्यांची एकुलती एक मुलगी सालेहा फिरदोस्त हिला मलकापूर येथील काझी मोहिनुद्दीन हे त्यांचा मुलगा काझी अझरूद्दिन यांच्यासाठी वरणगाव येथे बघायला आले होते. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम रविवारी दुपारी साडेअकरा वाजता सुरू असतांना वधु-वर पक्षाच्या लक्षात आले की सध्या कोरोनाची कार्यकाळ सुरू आहे. आज आपण तारीख ठरवणार आणि नंतर लग्न होईल. आपण दोघांनी ठरवून जर आजच लग्न उरकून टाकले तर ? यावेळी वरणगाव येथील शिवसेनेचे शेख सईद शेख भिकारी, जावेद शहा, शाहरूख भाई हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी हा प्रस्ताव दोघं कुटुंबियांपुढे मांडला. दोघा कुटुंबीयांनी या प्रस्तावास होकार दिला. लागलीच त्याच दिवशी सायंकाळी साडे पाच वाजता प्रतिभा नगर येथील आले इमरान मज्जिद मध्ये मौलवी आसिफ साहेब यांच्या हस्ते हा विवाह सोहळा २० लोकांमध्ये धार्मिक रीतीरिवाजाप्रमाणे पार पडला.
सगाई रस्म, लग्न बस्ता , फोटोग्राफी , वाद्य , फुलहार, घोडा, मंडप , जेवणावळ या सर्व कार्यक्रमास तिलांजली देऊन हा आदर्श निकाह संपन्न झाला. विशेष म्हणजे वर व वधू दोघांनीही यास संमती दिल्याने परिसरात हा मुस्लिम समाजातील हा आगळावेगळा विवाह सोहळा वरणगाव येथे पार पडला असून इतर मुस्लिम समाज बांधव यांनी सुद्धा असे आदर्श विवाह पार पाडून होणारा आर्थिक मंदीच्या काळात पैशांचा अपव्यय, वेळेचा अपव्यय टाळावा असे बोलले जात आहे. हा आदर्श विवाह सोहळा संपन्न केल्याने दोन्हीकडच्या मंडळींचे समाज बांधवांकडून अभिनंदन होत आहे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/273913561141804