वर्धा: वृत्तसंस्था । वर्ध्यात दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा पडल्याची घटना गुरुवारी घडली. दरोडेखोरांनी ३ लाख १८ हजार रुपयांची रोकड आणि साडेतीन किलो सोने लुटून पोबारा केला. बँक लुटल्यानंतर दरोडेखोर कर्मचाऱ्यांच्या दुचाकी घेऊन त्यावरून पसार झाले.
वर्ध्यामध्ये मुथुट फायनान्सच्या शाखेवर आज, सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी दरोडा पडला. दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवून तीन लाख १८ हजार रुपयांची रोकड आणि साडेतीन किलो सोने लुटले. लुटीनंतर त्यांनी कर्मचाऱ्यांच्या दुचाकीवरून पोबारा केला. दरोडेखोराने बँक व्यवस्थापकांच्या कमरेला पिस्तूल लावले आणि चेंबर पेटीतून लाखोंची रोकड लंपास केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या दरोड्याची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे. बोटांचे ठसे आणि दरोडेखोरांचे रेखाचित्र तयार करण्याचे काम सुरू आहे. बँकेतील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली जात आहे. सकाळी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे वर्ध्यामध्ये खळबळ माजली आहे.