पहूर. जामनेर, प्रतिनिधी । ‘नवी दिशा .. नवे उपक्रम ‘ राज्यस्तर समूह आयोजित नवोपक्रम स्पर्धेत पहूर पेठ येथील संतोषीमातानगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक पी. टी पाटील यांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट उपक्रम सादर केल्याबद्दल त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले आहे.
मुख्याध्यापक पी. टी .पाटील हे विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शाळेत आणि शाळे बाहेरही विविध उपक्रम राबवित असतात. लॉकडाऊन दरम्यान नवी दिशा नवे उपक्रम राज्यस्तर समूहाने आयोजित केलेल्या स्पर्धेत त्यांनी उत्कृष्ट उपक्रम सादर केले. त्याची दखल घेऊन त्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे, केंद्रप्रमुख भानुदास तायडे यांच्यासह शिक्षक मित्रांनी त्यांचे अभिनंदन केले असून सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.