पुणे : वृत्तसंस्था । मुख्यमंत्र्यांना संत दामाजीपंतांची भूमिका घ्यावी लागेल,’ असा वडिलकीचा सल्ला कष्टकऱ्यांचे नेते व रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.
बिदरच्या बादशाहच्या रागलोभाची, होणाऱ्या परिणामांची पर्वा न करता मंगळवेढ्याच्या दामाजीपंतांनी सरकारी धान्याची कोठारे भुकेल्या जनतेसाठी खुली केली होती. त्याप्रमाणे कोरोनाच्या संकटकाळात रिक्षाचालकांसह कष्टकरी जनतेला जगवायचे असेल; तर हे करावेच लागेल .
रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ कार्यरत करावे, मुक्त रिक्षा परवाना धोरण रद्द करावे, वाहन कर्जमुक्ती, लॉकडाउनच्या काळातील विमा हप्ते परत मिळावेत, यासह रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांबाबत रिक्षा पंचायतीने सत्ताधारी पक्षांकडे दाद मागण्याचा पवित्रा घेतला आहे.
त्या अंतर्गत सत्ताधारी शिवसेनेच्या डेक्कन जिमखान्यावरील कार्यालयासमोर रिक्षा पंचायतीच्या सदस्यांनी अभंग दिंडी निदर्शने केली. या अभिनव आंदोलनात संघटनेचे सरचिटणीस नितीन पवार यांच्यासह रिक्षाचालकांनी मराठी संतांचे अभंग सादर करत सत्ताधाऱ्यांना साकडे घातले.
शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांनी रिक्षाचालकांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. रिक्षाचालकांच्या प्रश्नांबाबत परिवहन मंत्री अनिल परब पुण्यात बैठक घेणार असल्याचे आश्वासन सेना पदाधिकाऱ्यांनी दिले.