पारोळा, प्रतिनिधी । मुख्यमंत्री सौर कृषी योजनेत ऑनलाईन मागणी अर्ज भरतांना जळगाव जिल्ह्यातील जळगाव व धरणगाव हे दोनच तालुक्याचे नाव येत असल्याने इतर तालुक्यांचे नांव ऑनलाईन नोंदणीत येत नसल्याने इतर तालुक्यांतील शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होत असल्याची बाब आमदार चिमणराव पाटील यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर इतर तालुक्यांचाही समावेश सौर कृषी योजनेत करण्यात आला आहे.
आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार उर्जामंत्री नितीन राऊत, उर्जाराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सौर कृषी योजनेत जिल्ह्यातील केवळ दोन तालुक्यांचा समावेश करण्यात आला असल्याची बाब निदर्शनास आणून देत पाठपुरावा केला होता. त्यानंतर संबंधित खात्याने त्याची दखल घेऊन त्वरित मुख्यमंत्री सौर कृषी योजनेत जळगाव व धरणगाव तालुक्यासह इतर १३ तालुक्यांचा समावेश केला. आमदार चिमणराव पाटील यांच्या पाठपुराव्याने जे पात्र शेतकरी ह्या योजनेपासून वंचित राहणार होते त्यांना दिलासा मिळाला आहे.
या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता ह्या योजनेचा लाभ जळगाव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना घेता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असलेला संभ्रम व नाराजी दूर झाली असून या योजनेसाठी पात्र असलेला आनंदी झाला आहे. आमदार चिमणराव पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याने शेतकऱ्यांप्रति असलेली आपुलकी दिसून आली.
आता मुख्यमंत्री सौर कृषी योजनेत जळगांव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना याचा लाभ मिळणार असून पूर्वी वंचित असलेल्या पात्र शेतकऱ्यांनी आमदार चिमणराव पाटील यांचे आभार मानले. तसेच आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार उर्जामंत्री नितीन राऊत, उर्जाराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले.