मुक्ताईनगर प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्यास लागून असलेल्या मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील कृषी मंडईमध्ये हमालकडून केळी उत्पादक शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट केली जात असल्याचा प्रकार मुक्ताईनगर तालुक्यात घडत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळी पीक घेतले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात कापणीवर आलेले केळी पिकाची कापणी न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर या काळात अतिशय कवडीमोल भावात शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांनी केळी माल खरेदी केला. त्यानंतर मात्र आज रोजी काहींनी केळीची रोपे लावली असता त्यावर सी.एम .व्ही .कुकुंबर व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना सदरची हजारो एकर क्षेत्रावरची रोपे उपटून फेकावे लागली. असे असताना कोरोना काळ संपल्यानंतर आज रोजी शेतात असलेल्या केळी पिकाला चांगला भाव आलेला आहे परंतु असे असताना आता मात्र हमालांच्या हेकेखोर प्रवृत्तीमुळे शेतकर्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
केळी उत्पादक शेतकरी आपल्या मुलांप्रमाणे केळी पिकाची निगराणी करतो आणि आणि हे पीक कापणी योग्य मोठे झाल्यानंतर त्याची पाहणी करण्याकरता बऱ्हाणपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल शेतकऱ्यांच्या केळी बागायतीत येऊन मालाची पाहणी करतो आणि बर्हाणपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बोर्डावर त्या राशीचा मालाची किंमत अठराशे रुपये असल्यास शेतकऱ्यांच्या शेतात येऊन तो हमाल त्या केळीचा मालावर डाग आहेत , याचा वादा आखूड आहे , हामाल चांगला नाही तो हिरवा गच दिसत नाही अशा प्रकारचे बहाणे करून शेतकऱ्यांकडून हजारो रुपयांची लाच मागतो. बोर्डावर सदर मालाची किंमत अठराशे रुपये असल्यास शेतकऱ्या जवळ आलेला मजूर त्या मालासाठी पंधराशे सोळाशे रुपये देण्याचे कबूल करतो. आणि शेतकऱ्याने त्या भावात तो माल न दिल्यास अथवा त्या मधुरास लाच न दिल्यास तोच मजूर त्या शेतकऱ्याचा केळीचा माल न कापता दुसऱ्या शेतात निघून जातो. यामुळे शेतकऱ्याचे कापणीवर आलेले तसेच पूर्ण वाढ झालेले केळी पीक कापले जात नाही. यामुळे मात्र तो मजूर शेतातून निघून गेल्यास तो माल गळून पडतो, पिकून जातो यामुळे मात्र शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होते हे होऊ नये त्यासाठी मग शेतकरी नाईलाजास्तव त्या मजुरास लाचे पोटी रक्कम देण्यास तयार होतो.
अशाप्रकारे केवळ महाराष्ट्रातीलच केळी उत्पादकांचे नव्हे तर मध्य प्रदेशातील केळी उत्पादकांचे सुद्धा आर्थिक शोषण केले जात आहे ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून चालू असतानाही त्याकडे शासन-प्रशासन अथवा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दखल घेतली जात नसल्याने अजून शेतकरी कुठपर्यंत नाडला जाईल ? असा सवाल उपस्थित होत आहे.