मुंबई : स्थायी समिती निवडणुकीत शिवसेनेची बाजी

मुंबई : वृत्तसंस्था । महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं बाजी मारली आहे. शिक्षण समिती अध्यक्षपदही शिवसेनेनं राखलं आहे. काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानं शिवसेनेला धक्का देण्याचा भाजपचा प्रयत्न निष्फळ ठरला.

दोन्ही समित्यांच्या अध्यक्षपदासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेसने उमेदवार उभे केले होते. तिरंगी लढतीत शिवसेनेकडे सर्वाधिक संख्याबळ होते. स्थायी समितीत शिवसेनेकडे ११, भाजप १०, काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे प्रत्येकी एक असे संख्याबळ होते. संख्याबळामुळं ही लढत शिवसेनेसाठी अनुकूल होती. मात्र, भाजपकडून नेमकी कोणती व्यूहरचना रचली जात आहे याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, काँग्रेसच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्यानं भाजपला फारसे काही करता आले नाही.

शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी शिवसेनेला मतदान केले. काँग्रेसचे नगरसेवक तटस्थ राहिले. त्यामुळं संध्या दोशी यांची शिक्षण समिती अध्यक्षपदी निवड झाली. शिक्षण समिती शिवसेनेकडे गेल्यानं स्थायी समितीत शिवसेनेचे संख्याबळ एकने वाढले. काँग्रेसच्या उमेदवाराने तिथंही माघार घेतल्यानं शिवसेनेचा मार्ग सुकर झाला. शिवसेनेचे यशवंत जाधव पुन्हा एकदा स्थायी समिती अध्यक्षपदी निवडून आले.
शिक्षण समितीच्या निवडणुकीत भाजपचे दोन नगरसेवक फुटल्याची चर्चा आहे.

Protected Content