मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईत करोनाने प्रचंड थैमान घातले आहे. मुंबईची परिस्थिती दिवसेंदिवस नियंत्रणाबाहेर चालली आहे. एवढे मोठे संकट असताना मुंबईतील प्रशासन हे भ्रष्टाचार करण्यात मग्न आहे. मुंबई महापालिकेने काढलेल्या वर्क ऑर्डरमध्ये ६ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. मुंबईत कोरोनाने प्रचंड थैमान घातले आहे. मुंबईची परिस्थिती दिवसेंदिवस नियंत्रणाबाहेर चालली आहे. एवढे मोठे संकट असताना मुंबईतील प्रशासन हे भ्रष्टाचार करण्यात मग्न आहे. गोरेगाव येथील नेस्को मैदानावर कोरोनाग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. कोविड सेंटरसाठी लागणाऱ्या तब्बल २३ वस्तूची ११ कोटी रुपयांची वर्क ऑर्डर महापालिकेने काढली असून, त्यात तब्बल ६ कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे. कोविड सेंटरचे काम कंपन्यांच्या सीएसआर फंडातून होणार असल्याचे महापालिकेने सुरूवातीला सांगितले होत, पण प्रत्यक्षात महापालिकेने त्यासाठी ११ कोटी रूपयांची वर्क ऑर्डर दिली असल्याचे उघडकीस आले आहे. कोविड सेंटरसाठी लागणाऱ्या वस्तू या ३ महिने भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला. मात्र त्यासाठी मोजलेली रक्कम ही त्या वस्तूंच्या प्रत्यक्ष किंमतीपेक्षा जास्त असल्याचे उघडकीस आल्याचे श्री.पाटील यांनी म्हटले आहे.
उदाहरणार्थ –
२ हजार उभे फॅन हे १ कोटी ८० लाख रुपयांनी भाड्याने घेतले मात्र, त्याची बाजारातील किंमत ही ७० लाख रुपये एवढी आहे. ८० सीसीटीव्ही हे ५७ लाख ६० हजार रुपयांनी भाड्याने घेतले, मात्र याची बाजारातील किंमत ही ८ लाख रूपये एवढी आहे. एकीकडे रुग्णसंख्या आटोक्यात येत नसताना, रोज कित्येक निष्पाप लोकांचे प्राण जात असताना मुंबई महानगरपालिका प्रशासन मात्र जनतेचे पैसे लुबाडण्यात मग्न आहे. एक माणूस म्हणून एवढ्या खालच्या पातळीला कसे कोण जाऊ शकते? सत्ताधारी यावर तरी कारवाई करणार का? प्रशासनाच्या कारभारात जे चालू आहे ते खरंच खूप धक्कादायक आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 28, 2020