मुंबई वृत्तसंस्था । राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ४ हजारच्या पार गेला आहे. मुंबईत २ हजार ७२४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी यांच्यानंतर आता मुंबई महापालिका मुख्यालयातही कोरोनाने शिरकाव केला आहे. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील दोघांना कोरोना झाला आहे. खबरदारी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कक्ष सील करण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्षात काम करणाऱ्या दोन जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे. मुंबई महापालिकेचे मुख्यालय हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे सीएसएमटी या ठिकाणी आहे. या मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे. कोणत्याही आपत्ती काळात जलद आणि प्रभावी प्रतिसाद कार्यान्वीत करण्यासाठी निरनिराळया यंत्रणांशी समन्वय साधण्याचे काम या कक्षाकडे असते.
राज्यात कोरोनाबाधितांचा आकड्याने ४ हजारचा टप्पा ओलांडला आहे. २० एप्रिल पर्यंत राज्यात नव्या 552 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ हजार २०० झाली आहे. तर दुसरीकडे कोरोनाबळींची संख्या ही २२३ वर पोहोचली आहे. राज्यात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतील रुग्णांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 456 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार ७२४ वर पोहोचला आहे.