पाचोरा येथील निवारागृहातील मजूरांशी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांनी साधला संवाद

जळगाव, प्रतिनिधी । कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत मजूरांचे स्थलांतर होत आहे. स्थलांतर होत असलेल्या मजूरांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने येथील शक्तीधाम येथे निवारागृह स्थापित करण्यात आले आहे. या निवारागृहास आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे आणि पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी संयुक्तपणे भेट देवून मजूरांशी संवाद साधला.

लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरु झाल्यापासून राज्यातील मजूर स्थलांतर करुन आपल्या गावाकडे परतत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच या मजूरांना हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा, याकरीता जिल्हा प्रशासनाच्यावतीने गेल्या तीन दिवसापासून पाचोरा येथे निवारागृह स्थापित केले आहे. या निवारागृहामध्ये एकूण ४३ परप्रांतीय मजूरांना ठेवण्यात आले आहे. यामध्ये सहा महिला व चार बालकांचा समावेश आहे. या निवारागृहास जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी भेट देऊन या ठिकाणची पाहणी केली. तसेच या मजुरांशी संवाद देखील साधला. मजुरांना देण्यात येणाऱ्या सुविधांचीही पाहणी केली. या निवारागृहातील मजूरांना प्रशासन व विविध सामाजिक संस्थांनी जीवनावश्यक वस्तु व इतर साहित्य उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी सामाजिक संस्थांचे कौतूकही केले.

मजुरांशी संवाद साधताना देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन असल्याने आपणास तोपर्यंत याचठिकाणी थांबावे लागणार असल्याचे उभयतांनी मजूरांना सांगितले. याठिकाणी आपणास शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. तसेच आवश्यकता भासल्यास या मजूरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व संबंधितांना दिल्यात. जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे आणि पोलीस अधीक्षक डॉ. उगले यांनी जळगाव-औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील दिघी नागद येथील चेकपोस्टला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. औरंगाबाद, मालेगाव हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले असल्यामुळे या भागातून कोणीही नागरीक जिल्ह्यात प्रवेश करणार नाही याची दक्षता तपासणी नाक्यावरील संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेण्याच्या सुचनाही दिल्यात.

यांची होती उपस्थिती
यावेळी पाचोरा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे, तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, नायब तहसीलदार अमित भोईटे, शक्ती धामचे श्री मोर तसेच महिंद्र अग्रवाल, बांठिया यांचे समवेत स्थानिक मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल तसेच नगरपालिकेचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

Protected Content