नवी मुंबई वृत्तसंस्था । दररोज वाढणारी कोविड रुग्णसंख्या, कंटेन्मेंट झोन लक्षात घेता ‘चेन ऑफ इन्फेक्शन’ तोडण्यासाठी मुंबई महापालिकेने ‘मिशन ब्रेक द चेन’ हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा उद्रेक रोखण्याचे मोठे आव्हान महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या समोर आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने कोविड-१९ च्या संदर्भात अनेक पावले उचलली जात आहेत. पालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, मेडिकल स्टाफ २४ तास–रात्रंदिवस आपली कामगिरी चोख पार पाडताना दिसून येत आहेत. दररोज वाढणारी कोविड रुग्णसंख्या, कंटेन्मेंट झोन लक्षात घेता ‘चेन ऑफ इन्फेक्शन’ तोडण्यासाठी युद्ध पातळीवर उपक्रम राबवणे गरजेचे आहे. त्यामुळे महानगरपालिकेने ‘मिशन ब्रेक द चेन’ हाती घेतले आहे.
या उपक्रमा अंतर्गत शॉर्ट टर्म, मिडीयम टर्म आणि लॉंग टर्म असे तीन स्तरीय निर्णय घेण्यात आले आहेत. सर्वप्रथम 31 जुलैपर्यंत हॉटस्पॉट भागातील लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. ज्या ठिकाणी लॉकडाऊन वाढवला आहे, त्या ठिकाणी दहा दिवस देखरेख आणि स्क्रिनिंग केली जाईल. या माध्यमातून जास्तीत जास्त तपासणी करणे आणि त्यांच्यापैकी कोणी पॉझिटिव्ह असेल तर त्याच्या उपचारासाठी लागणारा कालावधी यावर अंकुश ठेवला जाईल.
‘टर्न अराउंड टाइम’ कमी करण्यासाठी अँटीजनचे प्रमाण वाढवले आहे. जेणेकरुन नागरिकांना अहवाल लगेच हाती मिळू शकतील. नागरिकांच्या सहकार्यातून आणि कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून ‘मिशन ब्रेक द चेन’मध्ये आपण यशस्वी होऊ, असा विश्वास अभिजित बांगर यांनी व्यक्त केला.