मुंबई वृत्तसंस्था । मुंबई मध्यवर्ती कारागृहातील ७२ करोनाबाधित कैद्यांना शुक्रवारी कडेकोट बंदोबस्तात माहुल आणि चेंबूर परिसरातील रिकाम्या इमारतींमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
करोनाची साथ आल्यानंतर राज्य सरकारने अनेक कच्च्या कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्यापही तुरुंगात आहेत. त्यांना करोनाची लागण होऊ नये म्हणून तुरुंग प्रशासनाकडून शक्य तितकी काळजी घेतली जात आहे. काही दिवसांपूर्वीच आर्थर रोडमधील १५० कैदी व १५ तुरुंग कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आणि त्यानंतर त्यांच्या संपर्कात असलेल्या अन्य कैद्यांमध्ये भीतीचे वातावरणे झाले आहे.
अखेर तुरुंग प्रशासनानं एकूण ७२ जणांना चेंबूर व माहुल येथील रिकाम्या इमारतींमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. इतक्या मोठ्या संख्येने कैद्यांना पोलीस सुरक्षेसह कुठल्याही सरकारी रुग्णालयात ठेवणे शक्य नसल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.