मुंबईबाहेर न जाण्याच्या अटीवर दासगुप्ता यांना जामीन

 

मुंबई : वृत्तसंस्था । ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि टीआरपी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार पार्थ दासगुप्ता यांना उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. दोन लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन देत परवानगीशिवाय मुंबई सोडून जाण्यास मनाई केली आहे.

 

मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलेल्या टीआरपी घोटाळ्यात बार्कचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांना अटक करण्यात आली होती. दासगुप्ता टीआरपी घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचा आरोप पोलिसांनी आरोपपत्रातून केला होता.

 

दासगुप्ता यांना स्वतःचा पासपोर्ट न्यायालयाकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सहा महिन्याच्या काळात दासगुप्ता यांना प्रत्येक महिन्याला गुन्हे शाखेकडे हजेरी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

 

पार्थ यांनी एआरजी आउटलायर कंपनीचे संचालक आणि रिपब्लिक वृत्त वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासोबत संगनमताने कट रचून टीआरपी घोटाळा केल्याचा आरोप गुन्हे शाखेने न्यायालयासमोर सादर केलेल्या आरोपपत्रात केलेला आहे. टीआरपी घोटाळ्याप्रकरणी  आतापर्यंत १५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

 

दासगुप्ता यांनी एआरजीचे संचालक व रिपब्लिक वाहिन्यांचे मुख्य संपादक अर्णब यांच्याशी संगनमत केले, कट रचला, ‘बार्क’मधील आपल्या पदाचा गैरवापर करून टीआरपी मोजणीची पद्धत व तंत्र बदलले. अन्य वरचढ ठरणाऱ्या वाहिन्यांचे टीआरपी विश्लेषणातून गाळले. विश्लेषण न करताच टीआरपी जाहीर करून रिपब्लिकला वरचढ ठरिवले. प्रतिस्पर्धी वाहिन्यांची गुपिते रिपब्लिकसमोर फोडली, असे आरोप पोलिसांनी दासगुप्ता यांच्यावर ठेवलेले आहेत

Protected Content