मुंबई : वृत्तसंस्था । मुंबईतील लोकल सेवा सुरू करताना कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीची विभागणी करण्याबाबत राज्य सरकार अॅप अथवा तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाय करत नाही, तोपर्यंत लोकलप्रवास प्रत्यक्षात येणार नाही, असेच रेल्वेने पाठवलेल्या पत्रानुसार स्पष्ट होत आहे.
राज्य सरकारने सर्वांसाठी लोकल सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला. त्यावर मध्य, पश्चिम रेल्वे आणि रेल्वे पोलिस आयुक्तालयाकडून अभिप्राय मागवला होता. लोकलमधील गर्दी नियंत्रणासाठी राज्य सरकारकडून अॅप निर्मितीचे काम सुरू आहे. या किंवा अन्य तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्दी नियंत्रणाचे उपाय शोधावे. लोकल सुरू करण्यासाठी शक्य तितक्या लवकर बैठक आयोजित करावी,’ अशा आशयाचे पत्र मध्य आणि पश्चिम रेल्वेने राज्य सरकारला पाठवले आहे.
‘दर तासाला एक महिला विशेष लोकल चालवावी’, अशी सूचना राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला केली होती. ही सूचना फेटाळताना रेल्वे प्रशासनाने
कोरोनापूर्व काळातील फेऱ्यांचा दाखला दिला. ‘ साथीच्यापूर्वी सकाळी ८ ते ११ आणि दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत प्रत्येकी चार तर सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत दोन अशा एकूण १० महिला विशेष फेऱ्या होत्या’, असे रेल्वेने म्हटले आहे. महिला विशेष लोकल सुरू केल्यास साहजिकच महिला त्या लोकलसाठी प्लॅटफॉर्मवर वाट पाहत थांबतील. त्याच वेळी पुरुष प्रवाशांची वर्दळ कायम असल्याने प्लॅटफॉर्मवर अनावश्यक गर्दी होईल. या स्थितीत सुरक्षित वावरच्या नियमांचे पालन होणार नाही, याकडे रेल्वेने लक्ष वेधले आहे.
लोकलच्या फेऱ्या वाढवणे आणि गर्दी नियंत्रण व विभागणी यावर राज्य सरकार आणि रेल्वेचे अधिकारी यांच्यात २२ आणि २७ ऑक्टोबर रोजी बैठक पार पडली. या बैठकीत रेल्वेकडून कार्यालयीन वेळा बदलण्याची मागणी करण्यात आली. यावेळी राज्य सरकारने गर्दी विभागणीसाठी अॅपवर काम सुरू असल्याचे स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर कार्यालयीन वेळ बदलाचा मुद्दा मागे पडला आहे.