मुंबई (प्रतिनिधी) पुढील तीन महिन्यांत मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर संघटनांनी दिला आहे. त्यामुळे विशेष दक्षता घेण्याचे आदेश रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.
गुप्तचर संघटनेच्या अहवालानुसार, येत्या तीन महिन्यांत मुंबई रेल्वे स्थानकांवर हल्ला होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे तीन महिन्यांसाठी मुंबईतील रेल्वे स्थानकांसाठी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार आता सलग तीन महिने रेल्वे स्थानकावर अचानक तपासणी, सीसीटीव्ही चित्रणावर नजर, स्थानकावर मॉकड्रिल करण्याच्या सूचना केल्या आहेत. विशेषत: दिल्लीकडून येणाऱ्या मेल-एक्स्प्रेसमध्ये बॉम्बशोधक पथकाद्वारे आणि श्वान पथकाद्वारे तपासणी होणार आहे.