जळगाव प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील मुंदाने गावात तंटामुक्त गाव बक्षिस निधीत भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. या भ्रष्टाचारात सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह संबंधितांवर गुन्हे दाखल करावा मागणीसाठी मुंदाणे येथील सामाजिक कार्यकर्ता चंद्रकांत सोनवणे यांनी तक्रारी दिल्यात. पंरतू त्यांच्या तक्रारींची कोणतीही दखल न घेतल्यामुळे त्यानी आज शनिवार २ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
याबाबत माहिती अशी की, सामाजित कार्यकर्ते चंद्रकांत सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पारोळा तालुक्यातील मुंदाने ग्रामपंचायतीला शासनातर्फे तंटामुक्त अभियानांतर्गत गावाला दोन लाखाचे बक्षीस सन २०११-१२ मध्ये जिल्हाधिकारी यांच्याहस्ते देण्यात आले होते. मुंदाने ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच अलकाबाई दगडू पाटील, ग्रामसेवक राजेंद्र हिरामण पाटील, तंटामुक्ती समिती अध्यक्ष यांनी संगनमताने शासनाकडून मिळालेले २ लाख रूपयांचा निधी नियमानुसार कुठल्याच कामावर खर्च न करता फक्त कागदोपत्री बनावट दस्तावेज तयार करून निधी हडप केला आहे. याबाबत चंद्रकात सोनवणे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत निधी खर्च केल्याची माहिती मागविली होती. त्यात सरपंच आणि ग्रामसेवक यांनी दोन लाख रूपये परस्पर काढून घेतले असून गावात कुठलेच काम केलेले नाही. याबाबत एरंडोल गटविकास अधिकारी यांच्याकडे २०१६ मध्ये चौकशी करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. हा प्रस्ताव गेल्या ४ वर्षांपासून विस्ताराधिकारी गोकुळ लक्ष्मण बोरसे, राजेंद्र धोंडू इंगळे, गणेश प्रभाकर पाटील व गटविकास अधिकारी यांनी सरपंच व ग्रामसेवक यांची पाठराखन करत फाईल दडपून ठेवली आहे. याप्रकरणी सरपंच, ग्रामसेवक, विस्ताराधिकारी व गटविकास अधिकारी यांच्यावर भ्रष्टाचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली होती. परंतू त्यांच्या मागणीची दखल न घेतल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत सोनवणे यांनी महात्मा गांधी जयंती दिनी आज २ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित असलेले अधिकारी व कर्मचारी यांनी वेळीच दखल घेतल्याने हा अनर्थ टळला.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/349422440292745