मुंबई प्रतिनिधी । भाजपचे वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची इव्हीएम हॅकींग उघड होऊ नये म्हणून हत्या करण्यात आल्याचा दावा करण्यात आल्यानंतर याची रॉ मार्फत चौकशी करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.
इव्हीएम हॅकिंगबाबत माहीती जगजाहीर होऊ नये म्हणून भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आली, असा खळबळजनक दावा सय्यद शुजा या हॅकरने लंडनमध्ये सुरू असलेल्या ईव्हीएम हॅकेथॉनमध्ये केला. यामुळे देशभरातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, गोपीनाथ मुंडे या लोकनेत्याच्या मृत्यूची आणि सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशातील निवडणुकांची रॉ मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. ट्विटद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे.
धनंजर मुंडे यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे की, स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत सय्यद शुजा या सायबर एक्स्पर्टने केलेला खुलासा धक्कादायक आहे. स्व. मुंडे यांचा मृत्यू झाल्याच्या दिवसापासूनच हा अपघात आहे की घातपात असा संशय आम्हाला होता आणि आजही तो कायम आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची आणि इव्हीएम घोटाळ्याची चौकशी रॉ मार्फत करण्यात यावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.